Successful Farmer: देशाच्या शेतीयोग्य जमिनीचा मोठा भाग पारंपारिक पिकांनी व्यापलेला आहे. परंतू, सातत्यानं बदलणारं हवामान पारंपारिक शेती पिकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहोचवत आहे. त्यामुळं अपार कष्ट करुनही शेतकऱ्यांना योग्य उत्पन्न मिळू शकत नाही. तसेच, ही पिकं घेण्यासाठी दीर्घ कालावधीही लागतो. त्यामुळेच सध्या अनेक शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या बागायती पिकांकडे वळत आहेत. ही पिकं घेण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान मिळतंच, याशिवाय नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकरी चांगलं उत्पादनही घेत आहेत.
सरकारच्या मदतीनं बागायती पिकांकडे वळलेल्या (Success Story) शेतकऱ्यांमध्ये छत्तीसगडमधील (Chhattisgarh) कोरिया जिल्ह्यातील कृष्ण दत्त या शेतकऱ्याचाही समावेश आहे. कृष्ण दत्त यांची छत्तीसगडमधील बैकुण्ठपूर विकासखंडच्या महोरा गावात आपली 5 एकर जमीन कसतायेत. यापूर्वी ते आपल्या शेतजमीनीवर तांदूळ आणि मक्याचं पीक घेत होते. यासाठी ते पारंपारिक पद्धतीचा वापर करत होते, पण त्यांना फारसं उत्पन्न येत नव्हतं. त्यानंतर कृष्ण दत्त यांनी सरकारी मदत घेण्याचा निर्णय घेतला. आता कृष्ण दत्त फलोत्पादन विभागाच्या मदतीनं भाजीपाला लागवड (Planting Vegetables) करून शेतीतून चांगला नफा कमावत आहेत.
फलोत्पादन विभागाच्या मदतीनं उत्पन्न वाढलं
भाजीपाला उत्पादक शेतकरी कृष्णा दत्त सांगतात की, फलोत्पादन विभागाच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची माहिती मिळाली. फलोत्पादन विभागानं कृष्ण दत्त यांना शेतात सिंचनासाठी ठिबक सिंचन यंत्रणा बसवण्यासाठी 70 टक्के अनुदान दिलं. यानंतर अडीच एकर शेतात 1 लाख 29 हजार रुपये खर्च करून नव्या तंत्राचा वापर करून भाजीपाल्याची लागवड सुरू केली.
आज कृष्णा दत्त आपल्या शेतात कोबी, मिरची, वांगी, टोमॅटो, भोपळा आणि पपई ही पिकं घेतात, त्यातून वर्षभरात 8 ते 10 लाखांचं उत्पन्न मिळतं. ठिबक सिंचनाव्यतिरिक्त पॅक हाऊस योजना, शेड नेट योजना, पॉवर वीडर योजना आणि डीबीटी योजनेतूनही कृष्णा दत्त यांना लाभ मिळतोय.
ठिबक सिंचनातून मोठं उत्पादन
पारंपरिक शेतीचा मार्ग सोडून भाजीपाला पिकवणारे कृष्णा दत्त सांगतात की, ठिबक सिंचन पद्धतीच्या सहाय्यानं शेतीत भरपूर नफा झालाय. त्यामुळं पाण्याच्या कमी वापरात थेंब-थेंब सिंचनाद्वारे भाजीपाला पिकं घेतली जातायत. या आधुनिक सिंचन पद्धतीद्वारे शेतकरी बांधव त्यांच्या शेतात किंवा फळ-भाज्यांच्या बागांना सहज सिंचन करू शकतात. या तंत्रानं पिकाच्या मुळांमध्ये थेट सिंचन केलं जातं, जेणेकरून संतुलित पाण्याबरोबरच पोषक घटकही थेट पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचू शकतील.
टीप : वर दिलेली माहिती मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे देण्यात आलेली आहे. एबीपी माझा शेतकऱ्यांना आवाहन करतंय की, कोणताही बदल किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :