Agriculture News : शेती करताना शेतकऱ्यांना (Farmers) सातत्यानं विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी अस्मानी संकट असतं तर कधी सुलतानी संकट असतं. या सर्व संकटावर मात करुन काही शेतकरी भरघोस उत्पन्न घेत आहेत. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एका शेतकऱ्यानं कोथिंबीर पिकातून (Coriander Crop) भरघोस नफा मिळवला आहे. या शेतकऱ्याने अवघ्या दीड महिन्यात कोथिंबीर पिकातून तीन लाख रुपयांचं उत्पन्न घेतलं आहे. 


कोथिंबीरीला जागेवरच मागणी, किलोला 100 रुपयांचा दर


अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निलेश माळुंजकर या शेतकऱ्याने कोथिंबीर पिकाची लागवड केली होती. या पिकातून निलेश मांळुजरक हे शेतकरी मालामाल झाले आहेत. त्यांनी 40 गुंठ क्षेत्रावर म्हणजे एक एकरवर कोथिंबीरीची लागवड केली होती. या पिकातून त्यांनी मोठं उत्पन्न मिळालं आहे. केवळ दीड महिन्यातच त्यांच्या कोथिंबीरीला तीन लाख रुपये मिळाले आहेत. निलेश मांळुजकर यांच्या कोथिंबीरीला जागेवरच 100 रुपये किलोचा दर मिळाला आहे. 


लागवडीपासून आत्तापर्यंत 35 हजार रुपयांचा खर्च 


निलेश माळुंजकर यांनी आपल्या एक एकर क्षेत्रावर 31 ऑगस्टला कोथिंबीरीची लागवड केली होती. एक एकरामध्ये त्यांनी 35 किलो बियाणे वापरले होते. हे सर्व बियाणे हे गौरी वाणाचे होते. या पिकाची संपूर्ण लागवड आणि खतांचा खर्च आत्तापर्यंतचा एकूण खर्च हा 35 हजार रुपये आला आहे. दीड महिन्यानंतर त्यांच्या मालाला जागेवर मागणी मिळाली. व्यापाऱ्यांनी जागेवरच निलेश माळुंजकर यांची तीन लाख रुपयांना कोथिंबीर खरेदी केली. यासाठी शेतकऱ्याला कोणताही खर्च करावा लागणार नाही. व्यापारी त्यांच्या स्वत: च्या खर्चाने कोथिंबीर काढून नेणार आहेत. शेतकऱ्याला खर्च वजा करता या पिकातून निव्वळ 2 लाख 65 हजारांचे उत्पन्न मिळालं आहे.


स्प्रिंकलरच्या सहाय्याने पिकाला पाणी


निलेश माळुंजकर यांनी बेडवर कोथिंबीरीची लागण केली होती. स्प्रिंकलरच्या सहाय्याने त्यांनी पिकाला पाणी दिले आहे. पिकात जास्त पाणी होऊ नये म्हणून त्यांनी व्यवस्था केली होती. जास्त पाऊस पडला तर पिकात पाणी साचू नये म्हणून त्यांनी सगळी व्यवस्था केली होती. या सर्व कोथिंबीर पिकासाठी निलेश माळुंजकर यांना शेतकर शिवाजी आवटे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नियोजनाखालीच कोथिंबीर पिकाची संपूर्ण लागवड करण्यात आली होती. 
बाजारपेठेचा योग्य अभ्यास आणि पिकाचे योग्य नियोजन केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न घेता येत असल्याची माहिती शिवाजी आवटे यांनी दिली.