Strawberry farming : डाळिंबासाठी प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. थंड हवेत येणारे फळ म्हणून आतापर्यंत स्ट्रॉबेरीची ओळख होती. पण दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या आटपाडी तालुक्यात आता स्ट्रॉबेरीचा मळा फुलू लागला आहे. कृषी पदवीधर असलेल्या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती केली आहे.


दुष्काळी आटपाडीमध्ये पारंपरिक पिकांमध्ये बदल करत अक्षय सागर या कृषी पदवीधर शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी लागवडीचे धाडस केलं आहे. तेही हातातील नोकरी सोडून. कोरोना काळात अक्षयने नोकरी सोडली आणि गावी येत केशर आंब्याच्या बागेत आंतरपीक म्हणून स्ट्रॉबेरीची लागवड केली. दुष्काळी आटपाडी तालुक्‍यात स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यानिमित्ताने यशस्वी झाला आहे. कृषी पदवीधर असलेल्या अक्षय सागरने 35 गुंठ्यात मल्चिंग व ठिबक सिंचनावर बेड पद्धतीने आर वन जातीची स्ट्रॉबेरी लावली आहे.


अक्षयने 25 ऑक्टोबरला महाबळेश्वरमधील शेतकऱ्यांकडून मदर प्लांटपासून बावीसशे स्ट्रॉबेरी रोपं आणली. केशर आंब्याच्या बागेत आंतरपीक म्हणून त्याने स्ट्रॉबेरीची  लागवड केली. शेणखत, रासायनिक खतांचा वापर केल्यायमुळे स्ट्रॉबेरीचे पीक उत्तम दर्जाचे आले. ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान स्ट्रॉबेरीची लागवड करणे योग्य ठरले. लागण केल्यापासून दीड महिन्यातच उत्पन्न सुरू झाले. एका रोपास सरासरी एक ते दीड किलो उत्पन्न मिळत असल्याची माहिती अक्षयने दिली आहे. लागवडीचा खर्च वजा जाता एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी परिस्थिती असल्याचे अक्षयने सांगितले आहे.


आज या स्ट्रॉबेरीला आटपाडीमध्येच मार्केट उपलब्ध झाले आहे. या लोकल मार्केटमध्येच किलोलो 300 रुपयांचा दर मिळत आहे. तसेच अनेक ठिकाणाहून व्यापारी स्ट्रॉबेरीची मागणी देखील करत आहेत. दरम्यान, डाळिंब शेती सतत पडणाऱ्या रोगामुळं अडचणी येत आहेत. त्यामुळे येथील डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत स्ट्रॉबेरीसारखं एक नवीन फळ आपल्याकडे चांगलं येऊ शकतं याचं समाधान शेतकऱ्यांना मिळत आहे. दरम्यान, आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी डाळींब शेतीत क्रांती घडवली आहे. पाण्याच्या मुबलक उपलब्धतेच्या जोरावर आटपाडी तालुक्यातील शेती आता बहरत आहे. यात आता थंड हवेच्या ठिकाणी पिकवल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग शेतकऱ्याने यशस्वी करुन दाखवला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: