खटाव : सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुका म्हणजे कायमच दुष्काळाने ग्रासलेला. या पट्ट्यात शेती ही राम भरोसेच असते. कारण शेतकऱ्यांच्या पिकांवर निसर्ग अक्षरशः पाणीच फेरतो. एकतर पावसाचं प्रमाण अगदीच नगण्य, झालाच तर धो-धो बरसतो, तो ही जेंव्हा अपेक्षित असतो तेंव्हा अवकृपा दाखवतो. अशा अनेक समस्या झेलताना पदरी मात्र निराशाच येते. पिकासाठी खर्ची घातलेला पैसा हाती येण्याची ही शाश्वती नसते. मग अशा दुष्काळात स्ट्रॉबेरी बहरली, असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना? आमचा ही विश्वास बसत नव्हता, म्हणूनच आम्ही साताऱ्याच्या दुष्काळी खटाव तालुक्यातील 'त्या' शेताच्या बांधावर पोहचलो. अन पाहतो तर काय.... साक्षात या दुष्काळी जमिनीवर स्ट्रॉबेरी पिकलेली होती. साताऱ्याच्या खटाव मधील सचिन कोचरेकर आणि प्रशांत भोसले या प्रयोगशील शेतकऱ्यांनी ही किमया साधलीये.


स्ट्रॉबेरीची शेती म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतं ते थंड हवेचं ठिकाण. पण आता हीच स्ट्रॉबेरी चक्क दुष्काळात बहरलेली आहे. साताऱ्याच्या दुष्काळी खटाव तालुक्यातील हे चित्र सुखद धक्का देणारं आहे. सचिन कोचरेकर आणि प्रशांत भोसले या दोन प्रयोगशील शेतकऱ्यांनी ही किमया साधली. सचिन कोचरेकर म्हणतात, थंड हवेत पिकणारी स्ट्रॉबेरी उष्ण हवामानात कशी पिकवायची? हे आमच्यासमोर आव्हान होतं. यासाठी महाबळेश्वर मधील तज्ञ शेतकऱ्यांना आम्ही या ओसाड जमिनीवर आणलं. या उष्ण तापमानात स्ट्रॉबेरीची शेती करायची असल्याचं त्यांना सांगितलं. मग त्यांनी आम्हाला त्याबाबत मार्गदर्शन केलं. गेली तीन वर्षे आम्ही यावर अभ्यास केला, मग गेल्या ऑगस्टमध्ये तीस गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचे पीक घेतले. ऑक्टोबर मध्ये ही स्ट्रॉबेरी बहरली. आता रोज पंधरा हजारांप्रमाणे महिन्याकाठी पाच लाखांची उलाढाल सुरू झाली. पण प्रयोग इथंच थांबला नाही, तर प्रशांत भोसले सांगतात की याच स्ट्रॉबेरी मध्ये आंतरपीक घ्यायला सुरुवात केली. सध्या स्ट्रॉबेरी शेतीच्या काही क्षेत्रात लसणाची लागवड करण्यात आलीये. उर्वरित क्षेत्रात दुसरं आंतरपीक घेणार आहोत. तर आणखी शेतकऱ्यांनी ईच्छा व्यक्त केल्यास त्यांच्या सोबतीने या दुष्काळी भागात स्ट्रॉबेरीची शेती पहायला मिळेल. असं म्हणत दुष्काळी शेतकऱ्यांना पुढं येण्याचं आवाहन ते करतायेत. 


हैद्राबाद आणि गोव्याच्या बाजारात या स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे. त्यामुळेच रोज स्ट्रॉबेरीची तोड करावी लागते. पॅकिंग ही आलंच. यासाठी किमान दहा बेरोजगारांना रोजगार मिळालाय. या शेतीत काम करणाऱ्या मनीषा गोरवेंची मोठी चिंता मिटलीये. आधीच दुष्काळ आणि त्यात कोरोना यामुळं कुटुंबावर संकट ओढवलं होतं. पण सचिन आणि प्रशांत यांनी स्ट्रॉबेरी पिकविल्याने त्यांच्या हाताला रोज काम आहे. इथल्या रोजंदारीमुळं त्यांचं कुटुंब सावरलेलं आहे. मनीषा यांच्या प्रमाणे दहा कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटलाय. 


दुष्काळी भागात असे प्रयोग यशस्वी ठरू शकतात, यावर कोणालाच विश्वास बसेना. त्यामुळेच ही स्ट्रॉबेरी प्रत्यक्षात पाहण्यासाठी शेतावर तरुण शेतकरी पोहचतात. गावातील बागायत शेती करणारा विकास बागल म्हणतो, आम्ही आजवर कांदा, बटाटा, टोमॅटो, आल्याची शेती केली. निसर्गाच्या लहरिपणाने कायम दुष्काळ येतो, त्यामुळे आमच्या शेतीच्या प्रयोगात यश-अपयश ठरलेलेच आहेत. अशात या दुष्काळात स्ट्रॉबेरीची शेती हे ऐकून आम्ही अचंबित झालो. त्यामुळेच इथं येऊन या शेतीबद्दल माहिती घेतली. असा प्रयोग करायची ईच्छा निर्माण झाली. तरुण शेतकरी सुहास खुळेला देखील या शेतात आल्यावरच विश्वास बसला. थंड हवेत पिकणारी स्ट्रॉबेरी उष्ण तापमानात येत असेल तर तापमानावर मात करत शेतीचे प्रयोग करता येतील. याची खात्री पटली असं तो सांगतो. त्यामुळे या दोन प्रयोगशील शेतकऱ्यांनी दुष्काळी भागातील या शेतकऱ्यांमध्ये नवी उमेद निर्माण केल्याचं, दिसून आलं.


पाचवीला दुष्काळ पूजलेल्या या शेतकऱ्यांना अनेकदा कडू अनुभव आलेत आणि ते त्यांनी पचवलेत देखील. पण याच दुष्काळात दोन तरुण प्रयोगशील शेतकऱ्याने ही स्ट्रॉबेरी पिकवली. हाच गोडवा दुष्काळी पट्ट्यात बहरला तर प्रत्येक शेतकऱ्यांला सुगीचे दिवस येतील. हे नक्की.



हे ही वाचा-



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा