Solapur Zilla Sahakari Dudh Sangh : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघानं (Solapur Zilla Sahakari Dudh Sangh) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. जिल्हा दूध संघातर्फे आता 'गाव तिथं डेअरी' (Gav Tithe Dairy) संकल्पना राबवण्यात येत आहे. जिल्हा दूध संघाकडं दुधाचं संकलन वाढावं. तसेच याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा मिळावा, यासाठी प्रत्येक गावात डेअरी काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे (Ranjit Shinde) यांनी दिली. सध्या गावोगावी डेअरी काढायला सुरुवात झाली असल्याचेही शिंदे म्हणाले. 


सोलापूर जिल्हा दूध संघ अडचणीत आला होता. या दूध संघाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी, दुधाचं संकलन वाढवण्यासाठी आम्ही प्रत्येक गावात डेअरी ही संकल्पना राबवायला सुरुवात केल्याची माहिती रणजित शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. एबीपी माझाने गाव तिथं डेअरी या संकल्पनेबाबत रणजित शिंदे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.


रणजित शिंदे नेमकं काय म्हणाले?


सोलापूर जिल्ह्यात एक हजार गावं आहेत. या एक हजार गावापैकी फक्त 100 ते 150 गावातूनच जिल्हा दूध संघात दूध येत आहे. त्यामुळं संकलन खूपच कमी होत आहे. त्यामुळं जिल्हा दूध संघात संकलन वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळं आम्ही प्रत्येक गावात डेअरी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हा दूध संघाच्या डेअरीला दूध घालावं, कारण जो नफा दूध संघाला होईल तो नफा शेतकऱ्यांना देखील देण्यात येणार असल्याचे रणजित शिंदे यावेळी म्हणाले. 


दुधाचं संकलन वाढलं, 17 हजारावरुन 40 हजार लिटर दुधाचं संकलन


दूध संकलन नेमकं का होत नाही, दूध संघाची अशी अवस्था का झाली याबाबत देखील शिंदे यांना विचारण्यात आलं. मात्र, त्यांनी नुकताच माझ्याकडं जिल्हा दूध संघाचा कारभार आला आहे. शेतकऱ्यांना कदाचित वेळेवर पेमंट मिळत नसेल त्यामुळं अशी स्थिती निर्माण झाली असेल असे शिंदे म्हणाले. मात्र, आता आम्ही वेळेवर शेतकऱ्यांना दुधाची पगार देत आहोत. मी दूध संघाचा चेअरन होण्याआधी दुधाचं संकलन हे 17 हजार लिटरवर आलं होतं. मात्र, मी चेअरमन झाल्यापासून दुधाचं संकलन वाढलं आहे. सध्या 40 हजार लिटर दुधाचे संकलन होत असल्याचे रणजित शिंदेंनी यावेळी सांगितलं.


शेतकऱ्यांना कर्जपुरवठ्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करणार


सध्या दूध उत्पादकांसमोर अडचणी देखील आहेत. त्यांना बँकांकडून खेळत भाग भांडवल मिळत नाही. सरकारच्या अनेक योजना आहेत. मात्र, बँकांकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा होत नाही, त्यामुळं शेतकरी अडचणीत येतात असे रणजित शिंदे यांनी सांगितलं. याबाबत शासनाकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे रणजित शिंदे म्हणाले. जिल्हा दूध सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश हा आहे की, जे काही पैसे शिल्लक राहतील ते शेतकऱ्यांना परत देण्याचा आहे.  


महत्त्वाच्या बातम्या: