Shivsena Symbol: शिवसेनेचे निवडणूक चिन्ह (Shivsena Election Symbol) धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय हा अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार अॅड. अनिल देसाई  (Shivsena Leader Anil Desai) यांनी दिली. निवडणूक आयोगाकडून (Election Commission) सुनावणी अपेक्षित होती. मात्र, त्यांनी त्यापूर्वीच निवडणूक चिन्ह गोठवले असल्याचे देसाई यांनी सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैठक बोलावली असून त्यात महत्त्वाचे निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला अपेक्षित असलेले चिन्हं निवडणूक आयोग देईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना नेते खासदार अॅड. अनिल देसाई यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाचा निर्णय अनाकलनीय आणि अनपेक्षित आहे. निवडणूक आयोगासमोर आम्ही आमची बाजू मांडली. त्याअनुषंगाने काही कागदपत्रेदेखील सादर केली. निवडणूक आयोग आम्ही सादर केलेली कागदपत्रे तपासतील आणि त्यानंतर सोमवारी सुनावणी घेतील, त्यानंतर निर्णय देतील अशी अपेक्षा होती. मात्र, सुनावणी न करताच निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाकडून निष्पक्ष काम करणे अपेक्षित आहे. संविधानाने मोठी जबाबदारी निवडणूक आयोगावर टाकली आहे. मात्र, त्याला दूर सारून निवडणूक आयोगाने निर्णय दिला असल्याचे त्यांनी सांगितले. 


ठाकरे गटाचे निवडणूक चिन्ह कोणतं?


शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील रणनीतिबाबत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत शिवसेनेच्या संभाव्य निवडणूक चिन्हाबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या, उगवता सूर्य, ढाल तलवार, मशाल आदी चिन्हांची चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. त्यावर बोलताना देसाई यांनी म्हटले की, माध्यमांवर काय चर्चा सुरू आहेत, याबाबत आम्हाला काही कल्पना नाही. मात्र, आमच्या अपेक्षेनुसार, निवडणूक आयोगाकडून चिन्ह मिळेल अशी आम्हाला आशा असल्याचे देसाई यांनी म्हटले. आज होणाऱ्या बैठकीत सगळ्या पर्यायांवर निर्णय होणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.


बनावट प्रतिज्ञापत्राची आम्हाला गरजच काय?


ठाकरे गटाकडून बनावट प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. त्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हादेखील नोंदवण्यात आला आहे. याबाबत विचारले असता देसाई यांनी आम्हाला बनावट प्रतिज्ञापत्राची गरजच काय असा उलट प्रश्न केला. निवडणूक आयोगाला सादर होणारी शपथपत्रे दिल्लीत आहेत. किती शपथपत्रे दाखल होणार याची माहिती आधीच निवडणूक आयोगाला दिली आहे. त्यानुसार ही प्रतिज्ञापत्रे दिल्लीत आहेत. शिंदे गटाचे काय आरोप आहेत, त्याबद्दल कल्पना नसल्याचे देसाई यांनी सांगितले.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Politics Uddhav Thackeray: शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवलं; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...