Maharashtra Rain : परतीच्या पावसानं (Rain) राज्यात धुमाकूळ घातला आहे. अनेक राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. तसेच या पावसामुळं शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. दरम्यान, मुंबईसह ठाणे परिसरात देखील पावसानं चांगलीच हजेरी लावली. त्याचबरोबर बीड, कोल्हापूर, धुळे, पालघर, लातूर, सोलापूर, सांगली, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. आजही हवामान विभागानं (Department of Meteorology) राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. 


या परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसत आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान या पावसानं झालं आहे. काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस तसेच भाजीपाला पिकाचा समावेश आहे. त्याचबरोबर द्राक्ष बागांना देखील या परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. आजही राज्यात पावसाचा अंदाज दिला आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.


कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, भात, सोयाबीन, भूईमुग पिकांचं नुकसान


कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. वीजांच्या गडगडाटांसह पाऊस झाला. त्यामुळं वाहतुकीवरही परिणाम झाला. कोल्हापूर जिल्ह्याला 13 ऑक्टोबरपर्यंत हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.  सलग होत असलेल्या वादळी पावसाने तोंडाला आलेल्या पीकांची मात्र दैना होत आहे. जिल्ह्यात ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून सोयाबीन आणि भात कापणीला वेग आला आहे. त्यामुळे सुगी सुरु असतानाच पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीनला मोड येण्याची भीती आहे. दुसरीकडे शेतातील भात पीक झोपल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. जिल्ह्यात सोयाबीनची लागवड हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. दुसरीकडे करवीर, कागल तालुक्यात भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भात, सोयाबीन तसेच भूईमुग या पिकांच नुकसान होत आहे.


सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागांचं नुकसान


सांगली (Sangli) जिल्ह्यात देखील परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.  या पावसाने सोयाबीनसह, ऊस, खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर टोमॅटो आणि द्राक्ष बागांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. सांगली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात परतीच्या पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. सध्या सोयाबीन पिकांची काढणी सुरु आहे. तर काही ठिकाणी सोयाबीन काढून शेतात ठेवलं आहे. अशा स्थितीत जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं सोयाबीनचा मोठं नुकसान झालं आहे. तसेच भुईमूग, भाजीपाला या पिकांना देखील फटका बसला आहे. शेतात पाणी साचून राहिल्यानं हातात आलेली पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Sangli Rain : सांगली जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, खरीपाच्या पिकांसह द्राक्ष बागांना मोठा फटका