Sandalwood Farming Success: सुवासिक गुणधर्मांमुळं चंदनाच्या झाडाला विशेष महत्व. भारतात कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खरंतर या चंदनाची शेती होते. पण आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही चंदनाच्या शेतीनं भूरळ घातली आहे. महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं तब्बल 27 एकरावर चंदनाची लागवड करत कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली आहे. राजेंद्र रावसाहेब गाडेकर या प्रयोगशील शेतकऱ्यानं माळरानावर काही फळपिकांसोबत चंदनाची 14 हजार चंदनाची झाडं लावली. राज्य आणि केंद्राच्या अनेक योजनांचा लाभ घेत त्यानं चंदनाचा मळा फुलवलाय. आज ते आपल्या शेतीतील चंदनातून वेगवेगळे पदार्थही तयार करतात.
विशेष म्हणजे स्वत:ला आर्थिक फायदा झाल्यानंतर त्यांनी परिसरातील जवळपास ४०० शेतकऱ्यांनाही चंदन शेतीसाठी हातभार लावलाय. त्यामुळं या शेतकऱ्याची नगर जिल्ह्यात चांगलीच चर्चा आहे.
कशी केली चंदनाची शेती?
गाडेकर यांनी तमिळनाडूच्या मदुराईतून २०१७-१८ मध्ये पांढऱ्या चंदनाची रोपे आणली. दोन टप्प्यात चंदनाची लागवड करत एकाच वर्षत सुमारे २७ एकरात डाळिंब, संत्री, आवळा यासह चिंदनाची १४ हजार रोपं त्यांनी लावली. शेतात असा प्रयोग करणारे नगरमधले ते पहिलेच शेतकरी ठरलेत. या पिकांना योग्य पाणी मिळावं यासाठी ठिबकसिंचनाची सोय करत सामुहिक शेततळे योजनेतून ७५ लाख लिटर क्षमतेचे शेतततळे बांधले. शिवाय दोन विहिरींचा आधारही होताच. चंदनाला आठवड्याला अवघे ४ लिटर पाणी पुरते.
27एकरात 14 हजार चंदनाची झाडे
गाडेकर यांनी 27 एकर जमिनीवर 14 हजार चंदनाची झाडं लावली आहेत. यातून त्यांना कोट्यवधी रुपयाचा फायदा झाला असून कमी पाण्यात आणि कमी खर्चात त्यांनी चंदन शेती करत आर्थिक प्रगती साधली आहे. चंदनाच्या झाडापासून ते धूप आगरबत्ती,, तेल, पावडर अशा अनेक गोष्टी तयार करून विकतात. यातून त्यांना मोठे यश मिळालं आहे.चंदनाच्या झाडला साधारण तीन वर्षात बीया येतात. या बियांना ३०० ते ६०० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. चंदनाचे झाड स्वत: अन्न तयार करत नाही. त्यामुळे शेजारी कडूलिंबाचे झाड असेल तर वाढीला फायदा होतो.
चंदनाची शेती कायदेशीर आहे का?
भारतात चंदनाला सोन्याएवढं महत्व आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर्जेदार सुवास आणि उच्च प्रतिच्या चंदन तेलामुळे हे बेकायदेशीर असल्याचा गैरसमज असून भारतासह महाराष्ट्रात चंदनाची लागवड करणं संपूर्णत: कायदेशीर आहे. चंदन लागवडीसाठी कोणत्याही सरकारी संस्थेची अथवा विभागाची परवानगी लागत नाही. पण चंदनाची लागवड करत असाल तर काही कायदेशीर बाबी पूर्ण केल्या की लागवड करता येते. चंदनाची लागवड केल्यानंतर आधी तलाठ्याकडून सातबाऱ्यावर नोंद करून वन विभागाची परवानगी घ्यावी लागते. यासाठी महाराष्ट्र सरकारची चंदन कन्या योजनाही आहे. त्यातून शेतकऱ्याला १५ ते २० लाख रुपयांचा लाभ मिळतो.