Sugarcane FRP : उसाला मिळणाऱ्या एफआरपीच्या (FRP) मुद्द्यावरुन सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. आता शेतकऱ्यांना दोन टप्प्यात FRP मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी या मागणीसाठी राज्य विधिमंडळ प्रवेशद्वारावर रयत क्रांती संघटनचे प्रमुख सदाभाऊ खोत आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन केलं. तसेच राहिलेल्या उसाला हेक्टरी 50 हजार रुपयांचं अनुदान द्यावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
दरम्यान, विधानभवनाच्या परिसरात सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार सुधीर पारवे उपस्थित होते. राज्यातील अनेक कारखानदारांनी एफआरपीचे पैसे दिलेले नाहीत, अशा राज्यातील सर्व कारखानदारांवर सरकारने कारवाई करुन शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे द्यावेत अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. विधिमंडळ परिसरात ऊसाची मोळी खांद्यावर घेऊन सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन केलं. राज्य सरकार FRP बाबत अजूनही शेतकऱ्यांना न्याय देत नसेल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP एकरकमी मिळालीच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला वेळ नाही, एस टी कर्मऱ्यांच्या प्रश्नावर सरकार बोलत नसल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. राज्य सरकारने कपट कारस्थान करुन उसाची FRP दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही आम्हाला सभागृहात बोलू देत नसाल पण आम्ही रस्त्यावरची लढाई लढू असे खोत म्हणाले. साखर कारखानदारी मोडीत काढण्याचा डाव या सरकारने घातला आहे. साखर कारखाने खासगी करण्याचे काम सुरु असल्याचे खोत यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांचे नाव सांगता मग शेतकऱ्यांच्या FRP चे दोन तुकडे का करता? सहकारी साखर कारखाने खासगी का करता? असा सवाल यावेळी खोत यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या:
- तुम्हीही PM Kisan Yojana चे लाभार्थी आहात, मग लवकर करा ई-केवायसी; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
- Solapur Latest News : महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया असलेल्या सांगोल्यातून डाळिंब हद्दपार होण्याची वेळ