नंदुरबार : वाढते तापमान आणि विषाणूजन्य आजारांमुळे होणारी पानगळ अशा दुहेरी संकटात नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी सापडला आहे. विषाणूजन्य आजारांमुळे पानगळ तर वाढत्या तापमानात पपईची फळे पिवळे पडत असल्याने शेतकऱ्यांचा बागा उद्ध्वस्त होत आहेत. पिकासाठी केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.


नंदुरबार जिल्ह्यात पाच हजार हेक्टर क्षेत्रावर पपई पिकाची लागवड केली जाते. या वर्षी पपईचा हंगाम सुरु झाला आणि दराचा मुद्दा समोर आला. त्यातून मार्ग निघाला नाही तोच दुष्काळात तेरावा महिना म्हणावं अशी गत झाली आहे. जिल्ह्यात अचानक तापमानात वाढ झाली. तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर गेला. त्यात आणखी भर म्हणजे पपईवर आलेल्या विषाणूजन्य रोगांमुळे पानगळ झाली. पानगळ झाल्याने सूर्यप्रकाश थेट फळावर पडत असल्याने त्याचा परिणाम पपईच्या फळावर झाला. फळं  झाडावरच खराब होऊन पिवळी पडत असल्याने ती काढून फेकल्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांकडे उरलेला नाही. तर काही ठिकाणी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी गोणपाटाचे आवरण टाकावं लागत आहे.


हापूस आंब्यामागील शुक्लकाष्ठ कायम
तिकडे कोकणचा राजा अर्थात हापूस आंब्यालाही तापमान वाढीचा फटका बसत आहे. अगदी मार्चपासून बाजारात मिळणाऱ्या हापूसची प्रत्येक जण मोठ्या आतुरतेने वाट पाहतो. हापूसमुळे होणारी आर्थिक उलाढाल देखील मोठी. पण, हाच हापूस सध्या संकटांच्या मालिकेतून बाहेर पडताना काही दिसत नाही. मागील दोन वर्षे आलेली निसर्ग आणि तोक्ते वादळ, वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस, लांबलेली थंडी यांमुळे हापूसच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. परिणामी, शेतकऱ्यांना औषधं आणि फवारणीसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात देखील वाढ झाली. पण, हे सारं केल्यानंतर देखील हापूसवरचं संकट काही टळताना दिसत नाही. कारण, चाळीशी पार गेलेला उन्हाचा पारा याच हापूसकरता मारक ठरत असल्याचं शेतकरी सांगतात. गेले काही दिवस कोकणातील वातावरण उष्ण आहे. परिणामी सुपारी आणि बोराच्या आकाराची झालेली फळं आता देठ सुकत असल्याने गळून पडत आहेत. उन्हामुळे फळांवर डाग पडू नयेत म्हणून फवारणी करावी लागत असल्याने खर्चात देखील वाढ झाली आहे. अचानक उष्णतेमध्ये वाढ झाली आणि हापूसला मोठा फटका बसत आहे. दरम्यान, अशाच प्रकारे उन्हाच्या कडाक्यात वाढ झाल्यास फळगळ वाढण्याची देखील शक्यता आहे. उष्णतेमुळे पुनर्मोहरामुळे तयार झालेल्या फळाला देखील फटका बसण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.