Rice production : देशातील काही भागात सध्या जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे, तर ठिकाणी अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. देशातील अनेक ठिकाणी शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र दिसत आहे. कमी पावसामुळं यंदा देशात तांदळाच्या उत्पादनात (Rice production) घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपुऱ्या पावसामुळं यंदा भाताच्या लागवडीत घट झाली आहे. त्यामुळं गेल्या तीन वर्षांचा विचार केला तर यंदा तांदळाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यंदा तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्यता
भारतात यंदा मान्सूनचा पाऊस कमी झाला आहे. देशातील अनेक भागात पावसामुळं परिस्थिती बिकट असतानाचं, अनेक भागात अजिबात पाऊस झालेला नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. कमी पावसामुळं यंदा तांदळाच्या लागवडीत देखील घट झाल्याचे दिसून येत आहे. भारत हा तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. मात्र, यंदा मागील तीन वर्षाच्या तुलनेत तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळं यंदा जगभरात खाद्यपदार्थांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. तसेच पावसाच्या कमतरतेमुळं यंदा भारतातही भाताच्या लागवडीत घट झाली असल्यानं भाताच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
जगातील एकूण तांदूळ व्यापारात भारताचा वाटा 40 टक्के
तांदळाच्या उत्पादनात घट होण्याच्या भितीनं व्यापारी देखील चिंतेत आहे. भारतात आधीच महागाई वाढली आहे. त्यामुळं निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. भाताची पेरणी कमी झाल्यामुळं देशात तांदळाची टंचाई निर्माण होऊ शकते, त्यामुळं सरकार पुन्हा तांदळाची निर्यात थांबवण्याची शक्यता आहे. दरम्यान, जगातील एकूण तांदूळ व्यापारात भारताचा वाटा 40 टक्के आहे. भारत सरकारने यापूर्वीच गहू आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घालून स्थानिक बाजारपेठेतील किमती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे.
तांदळाच्या किंमतीत 10 टक्क्यांची वाढ
भारतात गेल्या काही दिवसांपासून तांदळाच्या किंमतीत वाढ झाली आहे. देशात दोन आठवड्यांत तांदळाच्या काही जातींच्या किंमती 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पश्चिम बंगाल, ओडिसा, छत्तीसगड या राज्यांमध्ये भाताचे उत्पादन जास्त आहे. मात्र, यावेळी कमी पावसामुळं भाताची पेरणी कमी झाली आहे. यासोबतच बांगलादेशसारख्या देशातूनही तांदळाची मागणी वाढली आहे. त्यामुळं तांदळाचे दरही वाढले आहेत. सप्टेंबरमध्ये तांदूळ निर्यातीची किंमत प्रति टन 400 डॉलरपर्यंत वाढू शकते. दरम्यान, जगभरात पिकवल्या जाणाऱ्या तांदळाचा सर्वाधिक वापर आशियाई देशांमध्ये होतो. त्यानुसार, आशियाई देशांच्या राजकीय आणि आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं तांदूळ ही महत्त्वाचं पिकं आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे यंदा गहू आणि मक्याच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: