Rice Production : यावर्षी देशात तांदळाच्या उत्पादनात (Rice Production) घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा म्हणजे 2022-23 मध्ये तांदळाच्या उत्पादनात जवळपास 10 दशलक्ष टनांची घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. कारण, चालू खरीप हंगामात तांदळाच्या पेरणी क्षेत्रात मोठी घट झाली आहे. याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यावर्षी तांदळाचे उत्पादन 10 दशलक्ष टनांची घटून  120 दशलक्ष टनांवर येऊ शकते अशी माहिती देखील व्यापाऱ्यांनी दिली आहे.


तांदळाच्या लागवडीत 13 टक्क्यांची घट 


दरम्यान, सध्या देशातील काही राज्यांमध्ये चांगला पाऊस कोसळताना दिसत आहे. तर काही राज्यांमध्ये अद्याप चांगला पाऊस झाला नाही. त्याठिकाणी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. मुख्य धान्य उत्पादक राज्यांमध्ये पावसाचा जोर अद्यापही वाढला नाही. कमी कमतरतेमुळं त्याठिकाणी तांदळाच्या लागवडीत 13 टक्क्यांची घट झाली आहे. कृषी मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती देण्यात आली आहे. 5 ऑगस्टपर्यंत भाताच्या लागवडीचे क्षेत्र हे 27.43 दशलक्ष हेक्टर होते. मागील वर्षीचा विचार केला तर यंदा लागवडीत घट आली आहे. एका वर्षापूर्वी 31.41 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली होती. 


कमी पावसाचा लागवडीवर परिणाम


सध्या तांदळाच्या लागवडीचा हंगाम संपला आहे. यंदा लावडीत घट आल्यामुळं उत्पादन देखील कमी होण्याची शक्यता असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. पश्चिम बंगाल हे तांदळाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य आहे. तसेच झारखंड, बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांमध्ये एकरी उत्पादनात देखील घट झाली आहे. 8 ऑगस्टपर्यंत पश्चिम उत्तर प्रदेशात ३६ टक्के पाऊस हा सरासरीपेक्षा कमी झाला आहे. तर पूर्व उत्तर प्रदेशात सरासरीपेक्षा 43 टक्के पाऊस कमी झाला आहे. बिहार आणि झारखंडमध्ये अनुक्रमे 38 टक्के आणि 45 टक्के पावसाची कमतरता नोंदवली गेली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये 46 टक्के कमी पाऊस पडला आहे.
 
2021-22 वर्षात तांदळाचे 129.66 दशलक्ष टन विक्रमी उत्पादन  


भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, 2021-22 पीक वर्षात (जुलै-जून) तांदूळ उत्पादन विक्रमी 129.66 दशलक्ष टन होते. 2021-22 या आर्थिक वर्षात भारताने 21.2 दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला होता. केंद्राकडे 1 जुलैपर्यंत 47 दशलक्ष टन तांदळाचा साठा होता. तर 13.5 दशलक्ष टनांचा बफ स्टॉक आहे. दरम्यान, मार्चमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा गव्हाच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. गव्हाचे उत्पादन घटले आहे. कमी उत्पादन आणि वाढलेल्या खासगी व्यापारामुळं मुख्य अन्नपदार्थांच्या सरकारी खरेदीमध्ये 56 टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळं तांदळाच्या साठ्यावरही ताण आला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: