Vinayak Mete  News  : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete)  यांचं अपघाती निधन झालं. मेटे यांच्या निधनानंतर सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान मेटे यांच्या अपघातानंतर या अपघाताची चौकशी करावी अशी मागणी होऊ लागली आहे. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली.  मेंदूला मार लागल्यानं जागेवरच मेटे यांचा मृत्यू झाला. त्यांना दवाखान्यात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं. हा अपघात नेमका कसा झाला याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. याबाबत आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 


असा झाला अपघात 


विनायक मेटे हे मागच्या सीटवर डाव्या बाजूला बसले होते. पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला त्यांचा बॉडीगार्ड होता. मेटे यांची गाडी हायवेच्या मधल्या लेनमध्ये होती. 10 चाकी ट्रक हा तिसऱ्या लेनला चालत होता. या ट्रकचालकाने तिसऱ्या लेनमधून मधल्या लेनमध्ये येणाचा प्रयत्न केला. यावेळी मेटे यांची गाडी वेगात होती. अचानक ट्रक मधे आल्यानं वेगानं मेटे यांची गाडी ट्रकला धडकली. चालकाला गाडी कंट्रोल करणं जमलं नाही. मेटे यांची गाडी डाव्या बाजूने ट्रकच्या उजव्या बाजूला धडकली. मेटे यावेळी झोपेत होते, त्यामुळं त्यांना काही कळायच्या आत वेगाने धडक बसल्यानं डोक्याला मार बसला. यात मेटे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बराच वेळ मेटे यांना मदत मिळाली नाही. या अपघातानंतर ट्रकचालक हा फरार झाला आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून याची पाहणी करत आहेत. चौकशीसाठी 8 पथकं नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती आहे. 



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक मेटे हे त्यांच्या फोर्ड Endeavour MH 01 DP 6364 या गाडीने मुंबईकडे निघाले होते.  हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं की, पहाटे पाच वाजता त्यांचा अपघात झाला. मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मेंदूला मार लागल्यानं जागेवरच मेटे यांचा मृत्यू झाला. त्यांना दवाखान्यात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं. 


घटनेमागचं सत्य समोर यावं, या संपूर्ण घटनेची चौकशी झाली पाहिजे - आबासाहेब पाटील


मराठा आरक्षणासाठी आणखी किती बळी घेणार? आज मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची बैठक बोलावली होती, त्यासाठी विनायक मेटे हे मुंबईला येत होते. मुंबई द्रुतगती मार्गावरून येत असताना ही दुर्घटना घडली आणि त्यानंतर जवळपास दोन तास रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात?  घटनेमागचं सत्य समोर यावं. या संपूर्ण घटनेची चौकशी झाली पाहिजे. अशा मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील (Abasaheb Patil) यांनी राज्य सरकारकडे केली आहे. 




मुख्यमंत्र्यांनी प्रकरणाच्या चौकशीचे दिले आदेश


विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेवर माझा विश्वास बसत नाही. मराठा समाजासाठी सातत्यानं लढणारा एक नेता हरपल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केली आहे. मराठा समाजासाठी न्याय देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली. गेल्याच आठवड्यात विनायक मेटे मला भेटले होते, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर आजचा दिवस खूप दु:खद आहे. राजकारणाची कधीच भरुन न निघणारी हानी झाल्याची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही फडणवीस म्हणाले.