Agriculture News : सोयाबीन-कापूस (Soybean-cotton) उत्पादकांच्या समस्यांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांची दिल्लीत भेट घेतली. सर्व मागण्या रास्त असून, शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत. त्यामुळं केंद्रीय वाणिज्य मंत्री, केंद्रीय कृषीमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून या मागण्यांबाबत त्यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची हमी शरद पवार यांनी दिल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी दिली  


पंतप्रधांनी भेट घेऊन कापूस-सोयाबीनचा प्रश्न मांडणार: तोमर


सोयाबीन-कापूस (Soybean-cotton) उत्पादकांच्या समस्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि वाणिज्य मंत्री पीयुष गोयल (Piyush Goyal) पत्र देणार आहे. तसेच त्यांची स्वत: भेट घेऊन शेतकऱ्यांची बाजू मांडणार असल्याचा शब्द देखील केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिला आहे. याबाबतची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिली. सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा, समस्या आणि मागण्यांबाबत तुपकरांनी तोमर यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. तसेच पोल्ट्री लॉबी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना घेऊन सोयाबीन-कापसाचे दर कमी होण्याबाबत दबाव आणत आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांचे मंत्री म्हणून केंद्रीय कृषीमंत्री या नात्याने सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बाजू आणि त्यांच्या हिताच्या मागण्या पंतप्रधानांकडे मांडाव्या, अशी विनंती तुपकरांनी तोमर यांना केली. यावेळी तोमर यांनी सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या समस्या आणि मागण्या सविस्तरपणे समजून घेतल्या. 


 शरद पवार शेतकरी प्रश्नांचा पाठपुरावा करणार 


शरद पवार यांनी देखील सोयाबीन-कापूस उत्पादकांचे प्रश्न समजून घेतल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी दिली. शेतकऱ्यांच्या हिताच्या या सर्व मागण्या रास्त आहेत. त्यामुळं केंद्रीय वाणिज्य मंत्री, केंद्रीय कृषीमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून या मागण्यांबाबत त्यांच्याकडे पाठपुरावा करतो, अशी हमी देखील शरद पवार यांनी दिल्याचे तुपकर म्हणाले.  गेल्या वर्षी आणि यंदा देखील सोयाबीन-कापसाचा प्रश्न दिल्ली दरबारी मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याची तुमची भूमिका कौतुकास्पद असल्याचे शरद पवार म्हणाले. 


काय आहेत मागण्या?


सोयाबीन आणि कापसाला खासगी बाजारात चांगला दर मिळावा, तो स्थिर रहावा, यासाठी सोयापेंड (डीओसी) निर्यातीला प्रोत्साहन द्यावं. मागील वर्षी आयात केलेल्या 5 लाख मेट्रिक टन सोयापेंडला डिसेंबरपर्यंत दिलेली मुदतवाढ रद्द करावी. सोयापेंड आयात करु नये. यंदा 15 लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करावी. सोयाबीनची वायदे बाजारावरील बंदी उठवावी. खाद्य तेल आणि इतर तेलावरील आयात शुल्क 30 टक्के करावं. कापसाचे आयात शुल्क पूर्वीप्रमाणे 11 टक्के ठेवावं. कापूस आणि सूत निर्यातील प्रोत्साहन द्यावं. तसेच सोयाबीनवरील 5 टक्के GST रद्द करावा आदी केंद्राशी संबंधित मागण्या रविकांत तुपकरांनी केल्या आहेत.


सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या प्रश्नांसाठी तुपकरांचा लढा


यावर्षी देखील रविकांत तुपकर यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरला आहे. त्यांच्या प्रश्नांसाठी लढा उभारला आहे. सोयाबीन आणि कापूस प्रश्नासंदर्भात तुपकरांनी बुलढाण्यात एल्गार मोर्चा काढला होता. तसेच मुंबईतील जलसमाधी आंदोलनाचा इशार दिला होता. याची दखल घेत राज्य सरकारने तुपकरांसोबत बैठक करुन याबाबत चर्चाही केली होती. 


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या विरोधात कोणताही निर्णय घेणार नाही, वाणिज्य मंत्र्यांची ग्वाही; तुपकरांनी दिल्लीत घेतली भेट