Puntamba Farmers Meeting : सध्या राज्यातील शेतकरी विविध संकटांचा सामना करत आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या समस्या आणि सरकारची भूमिका यावर चर्चा करण्यासाठी शेतकरी संपाची हाक देणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या समोरील वाढत्या समस्यांवर चर्चा होणार आहे. या बैठकीला पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांनी हजर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


पुणतांबा गावात आज  शेतकऱ्यांच्या समोरीला वाढत्या समस्यांवर चर्चा होणार आहे. अस्मानी आणी सुलतानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे आज सकाळी अकरा वाजता पुणतांबा गावात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना बैठकीस हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांचे संघटन करण्यावर चर्चा होणार असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. ऐतिहासिक शेतकरी संपाची हाक दिलेलं पुणतांबा गाव हे गाव आहे.


दरम्यान, 2016 साली ऐतिहासिक शेतकरी संपाची हाक पुणतांबा या गावातील शेतकऱ्यांनी दिली होती. तो संप यशस्वी झाला होता. त्यांच्या अनेक मागण्याही मान्य झाल्या होत्या. सध्या शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आहेत. शेतमालाला मिळणार कमी दर, वाढत जाणाऱ्या खतांच्या किंमती यासह सरकारची धोरणे यावर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीतून नेमका काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.  


सध्या राज्यात एकिकडे उन्हाचा चटका वाढत आहे. तापमान वाढीमुळे राज्यातील नागरिक हैराण झाले आहे. या तापमान वाढीचा पिकांवर देखील परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी अवकाळी पाऊस देखील पडत असल्याचे चित्र दिसत आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका फळबागांना बसला आहे. तसेच भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अशातच कांद्याच्या दराचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. सद्या कांद्याला खूप कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तसेच अतिरिक्त उसाचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी ऊस शेतातच उभा असल्याचे चित्र दिसत आहे. शेतमालाला मिळणारा कमी दर आणि वाढत जाणारा उत्पादन खर्च यामुले शेतकरी संकटात सापडला आहे. दुसरीकडे खतांच्या किंमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.