Dadaji Bhuse : राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना जरा आखडता हात घेत आहेत. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात मी सांगितले आहे की, शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध झाले पाहिजे. वेळेवर पीक कर्ज दिले तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार असल्याचे मत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले. ज्या बँका आखडता हात घेत आहे, त्यांची भुमिक चुकीची असल्याचे दादाजी भुसे म्हणाले. बियाणे, रासायनिक खतांच्या संदर्भात काही तक्रारी येत आहेत. त्याची मी दखल घेतली आहे. चुकीच्या दराने विक्री होत असेल्यास फौजदारी कारवाई होणार असल्याचे भुसे यावेळी म्हणाले.
तरुण शेतकऱ्यांच्या सुचनांचे स्वागत
तरुण शेतकऱ्यांचे सुचनांचे आम्ही स्वागत करु असेही भुसे म्हणाले. कोरोनाकाळ वाईट होता. कोरोनाने काही चांगल्या गोष्टी शिकवल्या. लहान गावामध्येही शेतकरी पिकवलेला माल ग्राहकांना विकत होता. काही मुलांनी अॅप तयार केले. ऑनलाईन माध्यमातून शेतमाल ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. लहान लहान प्रयोग केले, ते यशस्वी झाले असेही भुसे यावेळी म्हणाले. रासायनिक खतांच्या तक्रारी येत आहेत. त्याची मी दखल घेतले आहेत. आज त्याचे रिझल्ट दिसतील. ज्यादाच्या भावाने, चुकीच्या दराने विक्री होत असेल तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत. तसे आदेश दिले असल्याचे भुसे म्हणाले.
पीक विम्याच्या बाबतीत बीड मॉडेल लागू करावं
पीक विमा योजनेच्या अटी, शर्थी केंद्राकडून ठरवल्या जातात. राज्याच्या हातात फक्त त्या योजनांची अंमलबजावणी करणे एवढंच आहे. 2020 मध्ये शेतकऱ्यांना खूप कमी परतावा मिळाला ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान कंपन्यांना कळू शकले नाही असेही भुसे म्हणाले. बीड मॉडेल लागू करावे. यामुळे कंपन्यांच्या नफ्याला मर्यादा आहे. हे लागू करावे अशी आमची मागणी केंद्राकडे असल्याचे भुसे यावेळी म्हणाले.2021-22 वर्षात आम्ही नियमांचे पालन करुन, अतिवृष्टी झाले त्यावेळी शेतकऱ्यांना मदत केल्याचे भुसे म्हणाले. चालू वर्षात पीक विमा योजनेत 82 ते 84 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. 45 लाख शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचे कळवले. याची रक्कम ही 44 शे कोटी रुपये होती. 33 शे कोटी मिळवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असेही भुसे यावेळी म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi) येऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक घोषणा केल्या गेल्या, सोबतच विकासकामांचे दावे देखील केले गेले. सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना सारख्या महाभयंकर लाटेचा सामना करावा लागला. सरकारसमोर अनेक अडचणी आल्या. केंद्राकडून राज्यावर अन्याय होत असल्याच्या भावना राज्य सरकारमधील बड्या नेत्यांनी वारंवार व्यक्त केल्या. सत्ताधारी आणि विरोधी पक्षानं एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले. यासह विविध प्रश्नांवर आज दिवसभर एबीपी माझावर महाचर्चा होणार आहे. या चर्चेत कृषीमंत्री दादाजी भुसे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विविध प्रश्नावर त्यांची भूमिका मांडली.
राज्यातील दिग्गज नेते आणि मंत्र्यांचा सहभाग
या कार्यक्रमात सकाळी 10 वाजता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सहभाग घेतला. त्यांच्याशी कायदा सुव्यवस्था विषयावर संवाद झाला. तर 11 वाजता शालेय शिक्षण व्यवस्थेवर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी संवाद साधण्यात आला. 12 वाजता कृषीसंदर्भातील प्रश्नांवर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर दुपारी एक वाजता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. तर दुपारी 2 वाजता मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी गृहनिर्माण संबंधी प्रश्नावर चर्चा होणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ दुपारी तीन वाजता या कार्यक्रमात भाग घेतील तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे सायंकाळी 4 वाजता प्रश्नांची उत्तरं देतील. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील 4.30 वाजता या कार्यक्रमात सहभागी होतील तर महसूल संबंधी प्रश्नांवर बोलण्यासाठी मंत्री बाळासाहेब थोरात हे 5 वाजता कार्यक्रमात सहभागी होतील.
कुठे पाहाल कार्यक्रम
हा सर्व कार्यक्रम आपण आज दिवसभर एबीपी माझा चॅनलवर पाहू शकणार आहोत. तसेच एबीपी माझाच्या यू ट्यूब चॅनेलवर दिवसभर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल. सोबतच एबीपी माझाच्या वेबसाईट, फेसबुक, ट्विटरवरही कार्यक्रमाचे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत.