मुंबई : येस बँक-डीएचएफएल फसवणूक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेले पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले (Avinash Bhosle) यांना आज विशेष सीबीआय न्यायालयात हजर केलं जाणार आहे. भोसले हे महाराष्ट्रातील राजकारण्यांचे जवळचे सहकारी असल्याचं सांगितलं जातं. अविनाश भोसले यांना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (26 मे) सीबीआयच्या बीकेसी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर सायंकाळी त्यांना अटक करुन चौकशी सुरु करण्यात आली आहे.


अविनाश भोसले यांना पुण्यातून अटक करुन मुंबईतील वांद्र्यातील सीबीआय कार्यालयात ठेवलं आहे. आज त्यांना सीबीआय कोर्टात हजर करुन त्यांची कोठडी मागितली जाणार आहे.


30 एप्रिल रोजी अविनाश भोसले यांच्या घरी आणि अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडशी संबंधित असलेल्या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. मुंबई आणि पुण्यातील 8 ठिकाणी ही छापेमारी झाली होती. व्यावसायिक आणि रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाब्रिया यांना येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली होती. या अटकेशी संबंधित ही छापेमारी होती.


अविनाश भोसले यांना अटक प्रकरण काय?
- येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी ईडी, सीबीआयकडून याआधी चौकशी
- 2018 साली एप्रिल ते जून दरम्यान हजारो कोटी रुपये एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळते करण्यात आले
- वाधवान यांना येस बँकेकडून कर्ज मिळवून दिल्याचा आरोप
- सीबीआयच्या मते यात मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा समावेश होता
- बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, चित्रपट निर्माते संजय छाब्रिया, बलवा आणि गोएंका यांचा समावेश
- ईडीकडून याआधी अविनाश भोसले यांची 40 कोटींची संपत्ती जप्त


अविनाश भोसलेंवर ईडीकडूनही कारवाई
ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाने अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी फेमा (FEMA Act)कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. अविनशन भोसले यांच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये विविध कंपन्यांचे शेअर, मालमत्ता, पुण्यातील पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे. अविनाश भोसले आणि कुटुंबियांच्या बँक खात्यात असणारी 1.15 कोटी रुपयांची रक्कम देखील ताब्यात घेण्यात आली आहे. यामध्ये  हॉटेल वेस्टिन- पुणे  हॉटेल ली मेरिडियन- नागपूर, हॉटेल डब्ल्यू रिट्रीट अँड स्पा-गोवा  याचा समावेश आहे


अविनाश भोसले हे एबीआयएल ग्रुप ऑफ कंपनीचे प्रवर्तक आहेत. अविनाश भोसले हे प्रसिद्ध उद्योगपती आणि महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असलेले एक व्यक्ती आहेत. ते महाराष्ट्रातील मंत्री आणि कॉंग्रेस नेते विश्वजित कदम यांचे सासरे आहेत.


ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील भोसले यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी आणि मुंबईतील काही ठिकाणी छापा टाकला होता. अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित या दोघांचीही चौकशी करण्यात आली होती.


कोण आहेत अविनाश भोसले?
अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. रिअल इस्टेट किंग अशीही त्यांची ओळख आहे. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. कोट्यवधी रूपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे.