Agriculture News : कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण आणि आदिवासी गटासाठी पीक स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ज्वारी, गहू, हरभरा, करडई जवस या पिकांसाठी ही पीक स्पर्धा आयोजित केली आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.
राज्यात पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत गौरव करुन प्रोत्साहन देण्यासाठी पीक स्पर्धा राबवण्यात येते. पीक स्पर्धा तालुका स्तर, जिल्हास्तर आणि राज्य स्तरावर आयोजित करण्यात येणार असून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
पीक स्पर्धेत भाग सहभागी होण्यासाठी निकष काय?
या पीक स्पर्धेत भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटास 300 रुपये आणि आदिवासी गटासाठी 150 रुपये प्रमाणे प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र प्रवेश शुल्क असणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असावी, तसेच तो स्वत: कसत असावा. एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येईल. स्पर्धकाची स्वतःच्या शेतावर त्या पिकाच्या बाबतीत किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
अर्जासोबत विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र, शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खात्याच्या चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक राहील. सर्वसाधारण आणि आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी पीकनिहाय बक्षीस तालुका पातळीवर प्रथम क्रमांकासाठी पाच हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी तीन हजार आणि तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये ठेवण्यात आले आहे. जिल्हा पातळीवर अनुक्रमे 10 हजार, 7 हजार आणि 5 हजार रुपये तर राज्य पातळीवर प्रथम क्रमांकासाठी 50 हजार, द्वितीयसाठी 40 हजार तसेच तृतीय क्रमांकासाठी 30 हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे.
या योजनेबाबत अधिक माहितीसाठी
पीक स्पर्धेच्या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास https://krishi.maharashtra.gov.in या कृषी विभागाच्या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: