Parbhani News Update : परभणीतील एका शिक्षकाने आपल्या शेतीत अनोखे प्रयोग करून प्रयोगशील शेती केली आहे. मुंजाभाऊ शिलवणे असे या शिक्षकाचे नाव असून त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांबरोबरच शेती देखील प्रगतशील बनवली आहे. याबरोबरच ते गावातील इतर शेतकऱ्यांसाठी देखील प्रेरणादायी काम करत आहेत.  


परभणीच्या मांडाखळी येथील प्राथमिक शिक्षक आणि शेतकरी मुंजाभाऊ शिलवणे यांनी आपली शेती उत्तमरित्या पिकवली आहे. मुंजाभाऊ सध्या गावापासून पाच किलोमीटर असलेल्या पाळोदी जिल्हा परिषद शाळेवर पाथमिक शिक्षक आहेत. त्यांना वडिलोपार्जित अडीच एकर शेती आहे. त्यामध्ये त्यांनी मेहनत करून अजून दीड एकर शेती घेतली आहे. आज चार एकर शेतीत मोसंबी लागवड करून त्यात आंतरपीक म्हणून सोयाबीनचे पिक घेतले आहे. 


भाजीपाला, दुधव्यवसाय,गांडूळखत, शेणखत निर्मिती करण्यासह पाण्याची बचत व्हावी म्हणून त्यांनी सर्व शेती ड्रीपवर केले आहे. सकाळी नऊ वाजता शाळा असते, त्यामुळे पहाटेच उठून ते शेतीकडे जातात. आठ वाजेपर्यंत शेतीतील सर्व कामे आटोपून दिवसभराचे नियोजन लावून ते पाळोदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाठतात. तेथे देखील केवळ ज्ञानार्जन करत नाहीत तर विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवतात.  
 
मुंजाभाऊ यांचे वडील-आई,बायको आणि स्वतः मुंजाभाऊ हे सर्व जण शेतीत राबतात. वडील दुधाचा व्यवसाय सांभाळतात. आई आणि पत्नी त्यांना इतर शेतीकामात मदत करतात. मात्र सर्व नियोजन  मुंजाभाऊ यांचेच असते. यातूनच ते वर्षाकाठी चार ते पाच लाख रूपयांचा नफा कमावतात.  


स्वतःची शेती, शाळा आणि विद्यार्थी यापलीकडे जाऊन मुंजाभाऊ गावकऱ्यांची शेतीही प्रागितिशील व्हावी यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांनी गावातील इतर शेतकऱ्यांना सोबत घेऊन नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत स्वराज्य ऍग्रो शेतकरी बचत गट अवजार बँक तयार केलीय. ज्यात ते इतर शेतकऱ्यांना लागणारे अवजारे उपलब्ध करून देतात. शिवाय भाजीपाला आणि इतर पीके घेऊन मालाला बाजारपेठ देखील उपलब्ध करून देतात. 


शिक्षक असून केवळ ज्ञानार्जनात न अडकता स्वतःच्या शेती बरोबरच आपण इतर शेतकऱ्यांची देखील शेती प्रगत करू शकतो हे मुंजाभाऊ शीलवणे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे त्यांचा आदर्श इतरांनी घेऊन कष्टाची तयारी ठेवली तर आत्महत्या करण्याचा विचार देखील शेतकऱ्यांच्या मनात येणार नाही अशा भावाना त्यांचे गावकरी व्यक्त करतात.