Parbhani: कर्ज व नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्यानं पत्नीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. ही घटना परभणीच्या पालम तालुक्यातील पूयणी येथे रविवारी रात्री (9 जानेवारी) घडलीय. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केलीय.
रंगनाथ हरिभाऊ शिंदे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. रंगनाथ हे आपल्या पत्नीसह पालम तालुक्यातील पूयणी येथे वास्तव्यास होते. मात्र, रंगनाथ यांनी काल रात्री कर्जाला कंटाळून पत्नी झोपेत असताना तिचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री 10 आणि 12 वाजताच्या सुमारास घडली.
रंगनाथ शिंदे यांना चार ते पाच एकर जमीन असून दोन मुले असा परिवार आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या स्वतःच्या शेतात बैल जोडीचे औत केले होते. त्याच बरोबर दूध व्यवसाय म्हणून एक म्हैस घेतली होती. परंतु यावर्षी निसर्गाच्या अवकृपेनं सोयाबीनचं पीक, तूर आणि मूग गेल्यानं रंगनाथ नैराश्यात गेले. आता आपण हे कर्ज कसे फेडावे? असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला होता. यासंदर्भात ते इतरांशी वारंवार चर्चा करत होते.
त्यांना नेमके किती कर्ज होते हे मात्र कळू शकले नाही. मात्र कर्जाची परत फेड होत नसल्याने नाईलाजास्तव त्यांनी पत्नीचा जीव घेऊन स्वतःचे जीवन संपवले.या घटनेची फिर्याद दि. 10 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता पालम पोलिस स्टेशन येथे मयताचे मोठे भाऊ संतोष हरीभाऊ शिंदे यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी शेतकरी आत्महत्येची नोंद केली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-