Crime News : पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे यांची त्यांच्या कल्याणमधील राहत्या घरी हत्या झाली आहे. ही हत्या पत्नी आणि मुलीने केल्याचे उघड झाले आहे. पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे हे मुंबईच्या कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत होते. आरोपी पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री या दोघींना कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भाग्यश्री हिचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र भाग्यश्री सासरी नांदत नसल्याने बोरसे यांच्या घरात नेहमी वाद होत होते. याच वादातून गुरुवारी पत्नी ज्योती व मुलगी भाग्यश्री यांनी त्यांची हत्या केली.


कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौक हिरा पन्ना अपार्टमेंट येथे प्रकाश बोरसे हे आपली पत्नी ज्योती व मुलगी भाग्यश्री सोबत राहत होते. प्रकाश बोरसे हे मुंबई येथील कुर्ला पोलिस ठाण्यात कार्यरत होते. गुरुवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रकाश बोरसे घरी आले. त्यांचा पत्नी आणि मुली सोबत वाद झाला. या वादातून दोघींनी खलबत्त्याने प्रकाश यांच्या डोक्यावर प्रहार करत त्यांना जखमी केले. या हल्ल्यात प्रकाश यांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूनंतर दोघी घराचा दरवाजा बंद करून एका बाजूला बसून होते. जवळपास चार तास दोघी घरात बसून होत्या. बोरसे यांच्या घराबाबतची माहिती कल्याण कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांना मिळाली.


वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी पोलिसांचे एक पथक घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात शिरले. त्यावेळी घरात प्रकाश यांचा मृतदेह आढळून आला. प्रकाश बोरसे यांच्या मृतदेहा शेजारी या दोघी बसून असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी या दोघींना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. 


याबाबत पोलिस अधिकारी गवळी यांनी सांगितले की,  प्रकाश यांची मुलगी भाग्यश्री हिचे  तीन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं.  ती सासरी नांदत नसल्याने त्यांच्या घरात कायम वाद होत होते.  गुरुवारी प्रकाश बोरसे घरी आले असता त्यांचा याच विषयावरून पुन्हा वाद झाला व या वादातून पत्नी ज्योती व मुलगी भाग्यश्री यांनी खलबत्त्याने प्रकाश यांच्या डोक्यात प्रहार केला. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दोघींना देखील ताब्यात घेतले असल्याचे त्यांनी सांगितले