Palghar News : पालघर तालुक्यातील केळवा, माहीम येथे उत्पादित होणाऱ्या पानाला सुलभतेने सौराष्ट्र आणि दिल्ली बाजारपेठेत पोहोचण्यासाठी असणाऱ्या समस्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे अधिकारी (डीआरएम) सत्यकुमार यांनी पालघरचा दौरा केला. बागायतदारांसोबत सविस्तर चर्चा करून समस्यांवर मार्गाच्या आश्वासन दिले. या दौऱ्यामुळे पानासोबत पालघर तालुक्यातील नारळ (शहाळी) दिल्ली मार्केट पर्यंत पोहोचवण्याचे आशा पल्लवीत झाली आहे. 


केळवे- माहीम परिसरात सुमारे 250 एकर क्षेत्रावर पान लागवड असून या पानांमधील औषधी घटक तसेच सौराष्ट्र आणि उत्तरेकडील पालघरच्या पानाला असणारी मागणी शेतकऱ्यांनी सत्यकुमार यांना सविस्तरपणे सांगितली. कोरोना काळात किसान रेलच्या माध्यमातून होणारी पान वाहतूक बंद झाल्याने येथील बागायतदारांना पाण्याच्या टोपल्या मुंबई येथे ट्रक टेम्पोने पाठवून रेल्वे गाड्यांमध्ये लोडिंग कराव्या लागतात. यामुळे प्रति टोपली 200 रुपयांचा अतिरिक्त खर्च होत असून वाहतूक वेळेतही वाढ होते. माहीम, केळवा भागातून दररोज सुमारे साडेतीन ते चार टन पान उत्तरेकडे पाठवले जात असून त्यासाठी लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा देऊन त्यामध्ये पान लोडिंग करायची सुविधा देण्याची मागणी बागायतदार तर्फे करण्यात आली.


गुजरातकडे जाणारी सौराष्ट्र जनता एक्सप्रेस या गाडीचा पालघर येथील थांबा अवधी वाढवून त्यामध्ये पानाच्या पाट्या लोडिंग करण्याची सुविधा देण्याबाबत सत्यकुमार सकारात्मकता दाखवली. याचबरोबर दिल्लीकडे जाणाऱ्या संपर्क क्रांति एक्सप्रेस किंवा अन्य गाड्यांना मधील मालवाहू डब्यांमध्ये पालघर येथे पानाचे लोडिंग करण्यासाठी थांबा देण्यात बाबत विचार केला जाईल असे सांगितले.


डीआरएम यांच्या दौऱ्याच्या प्रसंगी रेल्वे समितीचे हृदयनाथ म्हात्रे, तेजराज हजारी, केदार काळे, महेश पाटील, नंदकुमार पावगी यांनी इतर मंडळींनी रेल्वे समस्यांविषयी विभागीय अधिकाऱ्यांना माहिती दिली. श्री सत्यकुमार यांनी माहीम येथे जाऊन माहीम पान उत्पादक सोसायटी तसेच माहीम विविध कार्यकारी सोसायटी या शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांना भेट देऊन या भागात उत्पादित होणाऱ्या शेतमाला विषयी माहिती घेतली. याप्रसंगी बाळकृष्ण राऊत, जयंत वर्तक, श्रीधर राऊत, राजेंद्र चौधरी आणि शेतकऱ्यांचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते.


नारळ दिल्लीपर्यंत पोहोचवण्याची आशा पल्लवीत


पालघर तालुक्यात उत्पादित होणारे पान, नारळ आणि इतर भाजीपाला दिल्ली बाजारपेठापर्यंत पोहोचवण्यासाठी गाड्यांना थांबा देण्यासोबत रेल्वे आणि डाकी विभागाच्या संयुक्त विद्यमाने नवीन व्यवस्था उभारण्याचा विचार सत्यकुमार यांनी याप्रसंगी मांडला. शेतकरी सोसायटीच्या प्रांगणातून शेतमाल डाक विभागाकडून स्वीकारला जाऊन रेल्वे मार्फत त्याची वाहतूक दिल्लीपर्यंत केल्यानंतर तो शेतमाल थेट व्यापाऱ्यां पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था विचाराधीन असून या व्यवस्थेच्या किफायतशीरपणाविषयी अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ही व्यवस्था अमलात आल्यास या भागातील नारळ दिल्लीपर्यंत पोहोचू शकतील असा आशावाद निर्माण झाला आहे.