Lumpy Skin Disease : दिवसेंदिवस राज्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं पशुपालकांमध्ये भितीचं वातावरण आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. या आजारामुळं गोवर्गीय प्रजातींमधील 29 बाधित जनावरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, लम्पी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण राज्य 'नियंत्रित क्षेत्र' घोषित करण्यात आलं आहे. वाढत्या लम्पी स्कीनच्या पार्दुर्भावामुळं प्रशासन देखील सतर्क झालं आहे.
 


नियंत्रित क्षेत्र म्हणजे नेमके काय?


गोजातीय प्रजातींची सर्व गुरे आणि म्हशी यांना ज्या ठिकाणी ठेवले जातात, त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय गोजातीय प्रजातीची बाधीत असलेली कोणतीही जीवंत किंवा मृत गुरे आणि म्हशी, गोजातीय प्रजातींच्या कोणत्याही बाधीत झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणत्याही भागात नेण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी, नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस अधिसूचनेनुसार मनाई करण्यात आली आहे.


याचा परिणाम काय होईल?


गोजातीय प्रजातींच्या गुरांचा किंवा म्हशींचा बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करुन किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात आली आहे. बीड आणि अहमदनगर जिल्लह्यात सर्व मोठे जनावरांचे बाजार भरवण्यास बंदी घालण्यात आली आहे.  


देशात कोण कोणत्या राज्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे


गुरे आणि म्हशीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा रोग राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, अंदमान व निकोबार (संघ राज्य क्षेत्र), पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गोवा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, ओरिसा, तामिळनाडू, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पसरला आहे. 


राजस्थान आणि गुजरातमध्ये लम्पी स्कीनचा कहर, दुधाचं उत्पादन घटलं


मिळालेल्या आकडेवारीनुसार, राजस्थानमधील 33 जिल्ह्यांमध्ये लम्पी आजाराचा प्रसार झाला आहे. तर गुजरातच्या 33 पैकी 26 जिल्ह्यांमध्ये या संसर्गाने कहर केला आहे. तर पंजाबमधील 23 जिल्हे आणि हरियाणातील सर्व 22 आणि उत्तर प्रदेशातील 21 जिल्हे याच्या विळख्यात आले आहेत. लम्पी आजारामुळं गाई पालनातून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मोठं संकट आलं आहे. त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दुसरीकडे दुधाचीही टंचाई निर्माण होत आहे. लम्पीची लागण होताच गायींची दूध देण्याची क्षमता कमी होत आहे. तर काही ठिकाणी पूर्णपणे दुधाचा पुरवठा बंद होत आहे. राजस्थानातील सर्वाधिक लम्पी बाधित पाच जिल्ह्यांमध्ये दुधाचे उत्पादन 30 टक्क्यांनी घटले आहे. त्याचबरोबर गुजरातमधील दूध उत्पादनावर 10 टक्के परिणाम झाला आहे. 


दरम्यान, राज्यांच्या सीमा तपासणी नाक्यांवर काटेकोर अंमलबजावणी आणि कार्यवाही करण्यासाठी भारत सरकारने सर्व राज्यांना व संघराज्य क्षेत्रांना सूचना दिलेली आहे. लगतच्या राज्यांमधून किंवा अन्य क्षेत्रामधून महाराष्ट्राच्या क्षेत्रामध्ये प्राण्यांच्या गोजातीय प्रजाती अजूनही प्रवेश करत असल्याचे समोर आले आहे. संपूर्ण राज्य 'नियंत्रित क्षेत्र' घोषित केल्याने, लंम्पी  चर्मरोगाचे नियंत्रण करता येणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या: