Onion Price : नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये (Navi Mumbai APMC) महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कांद्याची (Onion) आवक झाल्याने याचा परिणाम दरावर झाला आहे. नेहमी 100 ते 120 गाड्यांपर्यंत असणारी आवक आता 140 ते 150 गाड्यांवर गेली आहे. यामुळे कांद्याचे दर कमालीचे पडले असून एक किलोला 7 रुपयांचा दर झाला आहे. कांदा थेट 7 रुपयांवर आल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. गेल्या महिन्यात 15 रुपयांना विकला जाणारा कांदा आता 7 ते 8 रुपयांवर आला आहे. 


राज्यातील बहुतेक जिल्ह्यात कांद्याचे पीक शेतकरी घेत असल्याने उन्हाळी कांद्याचे नवीन पीक आल्याने उत्पादन वाढले आहे. महाराष्ट्राबरोबर गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक राज्यातही कांद्याचे पीक घेतले जात आहे. त्यामुळे परराज्यातही महाराष्ट्रातील कांद्याला मागणी नाही. दुसरीकडे निर्यात सुरु असली तरी उत्पादन प्रचंड असल्याने मार्केटमध्ये कांदा जास्त झाला आहे. या सगळ्यांचा परिणाम झाल्याने कांद्याचे दर जमिनीवर आले आहेत.


10 पोते कांदा विकल्यावर शेतकऱ्याला मिळाले फक्त दोन रुपये!


दिवसेंदिवस कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये 10 पोती कांद्यांची विक्री केल्यावर शेतकऱ्याला फक्त दोन रुपये मिळाले. ते पैसेही चेक स्वरुपात देण्यात आले. राजेंद्र तुकाराम चव्हाण असं या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. निर्लज्ज व्यापाऱ्याला दोन रुपयांचा चेक देताना लाज कशी वाटली नाही. राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा? असा सवाल राजू शेट्टींनी उपस्थित केला आहे.


महाराष्ट्रात सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन 


देशात सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन महाराष्ट्रात होते. इथूनच इतर राज्यांना कांद्याचा पुरवठा केला जातो. मात्र, यंदा महाराष्ट्रात कांद्याचे दर घसरले आहेत. कांद्याला रास्त भाव मिळत नसल्यानं शेतकरी नाराज आहेत. कांद्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांशी सौदेबाजी करत आहेत. असं असतानाही कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.


नाशिक जिल्ह्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन


नाशिक जिल्ह्यात सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. या जिल्ह्यात अधिकाधिक शेतकरी कांद्याची लागवड करत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून कांद्याच्या भावात सातत्याने कमी अधिक फरकाने घसरण होत असताना शेतकरी मात्र अजूनही कांदा शेतीवर अवलंबून आहे. असं असताना रात्रीचा दिवस करुन पिकवलेला कांदा कवडीमोल भावात विकला जात आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहेत.