Agriculture News Palghar : शेतकरी (Farmers) सातत्यानं शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. त्यामाध्यमातून चांगला नफाही मिळवत आहेत. असाच एक वेगळा प्रयोग पालघर (Palghar) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. वाडा तालुक्यातील 'गातेस' (Gates) या गावानं  फुलशेतीतून (Flower Farming) आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पाहुयात गातेस गावातील शेतकऱ्यांच्या फुलशेतीच्या प्रयोगाची यशोगाथा


50 ते 60 एकर क्षेत्रावर फुलशेती, आंतरपीक म्हणून भाजीपाला लागवड


पालघर जिल्ह्यात भात हे मुख्य पीक घेतलं जातं. त्यामुळं पालघर म्हटलं की, येथील शेतकरी हा भात पिकावर अवलंबून असणारा शेतकरी म्हणून ओळखला जातो. मात्र हीच ओळख वाडा तालुक्यातील गातेस या गावानं बदलत फुलशेतीतून आपली वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. गावातील 25 ते 30 शेतकऱ्यांनी एकत्र येत 50 ते 60 एकर पेक्षाही जास्त क्षेत्रावर फुलशेती आणि आंतरपीक म्हणून भाजीपाला लागवड करत जिल्ह्यात एक शेतीत नवीन आदर्श निर्माण केला आहे. 


इतर पिकांना हवामान बदलाचा फटका बसत असल्यानं फुल शेतीचा निर्णय


वाडा शहराच्या दक्षिणेस असलेलं हे गातेस गाव आहे. या गावात मागील अनेक वर्षांपासून वाडा, कोलम या वाणाची भात शेती केली जात होती. मात्र, सतत बदलणाऱ्या हवामान लहरींमुळं याचा फटका येथील शेतकऱ्यांना बसू लागला आहे. पुढे या गावातील अनेक शेतकरी हे रब्बी हंगामात हरभरा लागवडीकडे वळले होते. परंतू, कालांतराने यावरही हवामान बदलाचा परिणाम आणि उत्पादन खर्च वाढल्यानं येथील शेतकऱ्यांनी अखेर फुल शेतीचा निर्णय घेतला. गावातील 25 ते 30 शेतकऱ्यांनी एकत्र येत 50 एकर पेक्षाही जास्त क्षेत्रावर फुल शेतीचा अनोखा प्रयोग केला आहे. या फुल उत्पादकांनी डिसेंबरच्या सुरुवातीपासून फुल शेतीची लागवड केली असून सध्या या गावात फुलशेती पासून उत्पन्न येण्यास सुरुवात झाली आहे.


आठवड्यातून दोनदा दहा हजार किलो फुलांची विक्री


मागील दहा वर्षांपासून या शेतकऱ्यांनी एकत्र येत हा अनोखा उपक्रम राबवला आहे. या फुलशेतीमुळं येथील शेतकऱ्यांची आर्थिक घडीही मजबूत होऊ लागली आहे. या गावात सध्या लाल आणि पिवळ्या झेंडूच्या फुलांची लागवड होत असून, या फुलशेतीत आंतरपीक म्हणून टोमॅटो, भोपळा, कोबी या भाजीपाल्यांची पीक घेण्याची सुरुवात केली आहे. सध्या या गावातून आठवड्यातून दोनदा फुलांची विक्री होते. महिन्याला 25 ते 30 लाख रुपयांची उलाढाल होते. एका तोडणीला साधारण 8 ते 10 हजार किलो फुलांचे उत्पादन होते.


झेंडूच्या फुलांना प्रति किलो 40 ते 45 रुपयांचा दर


गातेस गावाने सध्या स्वतःची ओळख झेंडूच्या फुलांचे गाव अशी निर्माण केली आहे. येथील फुलं ही वाशी, मुंबई, कलकत्ता सुरत या भागात विक्रीसाठी जातात. सध्या झेंडूच्या फुलांना 40 ते 45 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. आठवडाभरात येथील एका शेतकऱ्याला 55 ते 60 हजार रुपयांचा नफा होत आहे. अवघ्या चार महिन्यात हे उत्पन्न घेतलं जात असलं तरी भात पिकापासून मिळणाऱ्या नफ्यापेक्षा हा नफा अधिक असल्यानं येथील शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तर व्यापारीही जागेवर येऊन ही फुलं खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही वाचत आहे.


पर्यायी शेती केल्यास आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत


पालघर जिल्ह्यात अनेक भागात रब्बी आणि हंगामी या दोन्ही वेळेस तांदळाची शेती म्हणून प्रमुख पीक पाहिलं जातं. मात्र, यातून येथील शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न सुटत नसल्यानं या भागात स्थलांतरणाचं प्रमाणही जास्त आहे. मात्र, गातेस गावातील शेतकऱ्यांप्रमाणेच जर जिल्ह्यातील इतर शेतकरीही पर्यायी शेतीकडे वळले तर येथील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास वेळ लागणार नाही. 


महत्त्वाच्या बातम्या:


Valentine Day: नांदेड फुलबाजारामुळे फुलली फुलशेती, 'गुलाब' बनला तीन हजार कुटुंबांचा आधार