Pradhan Mantri Fasal Bima Yojana : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) खरीप 2022 च्या हंगामासाठी विमा योजनेत सहभागी होण्याच्या तारखेत एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे.  खरीप 2022 हंगामासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ही 31 जुलै म्हणजे आजपर्यंत होती. मात्र, आज रविवार हा शासकीय सुट्टीचा वार येत असल्यामुळं केंद्र शासनाने मार्गदर्शन सूचनेत बदल केले आहेत. त्यामुळं या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी एका दिवसाचा अवधी मिळाला असून 1 ऑगस्ट 2022 पर्यंत ही मुदत असणार आहे. 


शेतकऱ्यांनी यासबंधीची कार्यवाही करावी


यासंबधी केंद्र सरकारकडून मार्गदर्शन सूचनेचे एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान याबाबत सर्व संबंधितांनी, शेतकऱ्यांनी नोंद घेऊन उचित कार्यवाही करावी, असे आवाहन मुख्य सांखिक विनयकुमार आवटे यांनी केले आहे. खरीप हंगाम 2022-23 च्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी 31 जुलैपर्यंत सहभागी होण्याचं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं होतं. मात्र, 31 जुलैला म्हणजे आज रविवार येत असल्यानं या योजनेत सहबागी होण्यासाठी एक दिवसाची मुदत देण्यात आली आहे. ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित पिकांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. अधिसूचित पिकांसाठी खातेदाराच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीनं शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र असल्याचंही कृषी विभागानं सांगितलं आहे. या योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी 70 टक्के जोखिमस्तर निश्चित करण्यात आला आहे.


विमा संरक्षण


या योजनेअंतर्गत हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळं पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळं होणारं नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळं पिकांचं होणारं नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंत कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट वादळ चक्रीवादळ, पुरक्षेत्र जलमय होणे, भुसखलन, दुष्काळ पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे पिकांचे होणारे नुकसान आणि नैसर्गीक कारणांमुळे पिकाचे होणारे काढणी पश्चात नुकसान अशा जोखमीच्या कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाणार आहे.ई-पीक पाहणी अंतर्गत पीकांची नोंद करण्यात यावी. विमा योजनेत विमा घेतलेले पीक आणि ई-पीक पाहणीमध्ये नोंदवण्यात आलेलं पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उदभवल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदवण्यात आलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या: