Unseasonal rain Dharashiv : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे, तर कुठं अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) तडाखा आहे. मराठवाडा आणि विदर्भात अवकाळीचा जोर अधिक पाहायला मिळत आहे. दरम्यान, मराठवाड्यातील धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये फळबागांसह पॉली हाऊसला मोठा तडाखा बसला आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली आहेत. तर शेत शिवारात पाणीच पाणी साचलं आहे. दरम्यान, भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील  (Ranajagjitsinha Patil) यांनी थेट बांधावर जात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तर दुसऱ्या बाजूला ओमराजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) हेदेखील शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्याचे पाहायला मिळालं. 


सरकारने ठोस मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी


धाराशिव जिल्ह्याला शनिवारी रात्री अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. यामध्ये फळबागांच मोठं नुकसान झाले आहे. यावेळी पावसासह वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणचे झाडे उन्मळून पडली आहेत. तर शेत शिवारात पाणीच पाणी पाहायला मिळालं आहे. पॉली हाऊसचे देखील मोठे नुकसान झाले आहे. सरकारने आम्हाला ठोस मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 


प्रशासनाला तातडीनं पंचनामे करण्याच्या सुचना 


धाराशिव तालुक्यातील जवळा दुमाला गावात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जावून नुकसानीचा आढावा घेतला. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या फळबागांसह पॉलीहाऊसचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, प्रशासनाला तातडीनं पंचनामे करण्याच्या सुचना राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्या आहेत. तर शेतकऱ्यांना मदत मिळवुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलीय. 


ओमराजे निंबाळकरही शेतकऱ्यांच्या बांधावर 


दरम्यान, एका बाजूला राणा जगजितसिंह पाटील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला खासदार ओमराजे निंबाळकरांनी देखील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत आमदार कैलास पाटील हेदेखील उपस्थित होते. निंबाळकरांनी कळंब तालुक्यातील मस्सा, अंदोरा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जावून नुकसानीचा आढावा घेतला. फळ बागांसह, पॉली हाऊसचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळवून देण्यासाठी ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकऱ्यांशी संवाद साधला आहे.


महत्वाच्या बातम्या:


वातावरण फिरलंय... पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पाऊस; कोकणातही मुसळ'धारा', बळीराजा चिंताग्रस्त