Natural Farming: सध्या नैसर्गिक शेतीचं (Natural Farming) महत्व वाढत आहे. अनेक शेतकरी नैसर्गिक शेती करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, 'नैसर्गिक शेती' संदर्भात उद्या (6 ऑक्टोबर) पुण्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत (Governor of Gujarat Acharya Devvrat), महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेकडून (आत्मा) देण्यात आली आहे.


नैसर्गिक शेती करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अनुभव ऐकायला मिळणार


उद्या नैसर्गिक शेतीसंदर्भात पुण्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं राज्यपाल आचार्य देवव्रत हे त्यांनी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे केलेले नैसर्गिक शेतीचे प्रयोग आणि प्रसाराबाबत मार्गदर्शन करणार आहेत. राज्यभरातून सुमारे दोन हजाराहून अधिक शेतकरी या कार्यशाळेला उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तांत्रिक सत्रात तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील होणार आहे. तसेच नैसर्गिक शेती करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अनुभव देखील यावेळी ऐकायला मिळणार आहेत. 


नैसर्गिक शेतीबाबतच्या एका प्रदर्शनाचेही आयोजन


दरम्यान, उद्या होणाऱ्या नैसर्गिक शेती या कार्यशाळेसह आणखी एक कार्यक्रम होणार आहे. नैसर्गिक शेतीबाबतच्या एका प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाच्या युट्यूब चॅनलवर होणार आहे. या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय कार्यालये, कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन संस्था आदी ठिकाणी करण्यात येणार आहे. या कार्यशाळेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आत्माचे कृषी संचालक दशरथ तांभाळे यांनी केलं आहे.


 खते आणि रसायनांच्या वापरामुळे अन्नधान्याचा उत्पादन खर्चात वाढ


सध्या खते आणि रसायनांच्या वापरामुळे अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी नैसर्गिक शेती केली जात आहे. नैसर्गिक शेती ही काळाची गरज असून नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांना थेट फायदा होईल याती शाश्‍वती देणारा शास्त्रीय मार्ग शोधणे देखील गरजेचं आहे. रसायने आणि खतांच्या अतिरिक्त वापरामुळे सध्या अन्नधान्य आणि भाजीपाल्याचा उत्पादन खर्च वाढला आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक शेतीचे महत्त्व लक्षात येते. कारण नैसर्गिक शेती ही रसायनमुक्त पद्धत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


PM Narendra Modi : नैसर्गिक शेतीचे सूरत मॉडेल संपूर्ण देशासाठी आदर्श बनेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी