नाशिक : भारताच्या एकूण कांदा निर्यातीपैकी (Onion Export) सर्वाधिक कांदा निर्यात बांगलादेशमध्ये (Bangladesh) होते. मागील वर्षी 20 टक्के तर त्याआधीच्या वर्षी 17 टक्के कांदा एकट्या बांगलादेशमध्ये निर्यात झाला होता. परंतु, आता बांगलादेशमध्ये जानेवारी अखेरीस स्थानिक शेतकऱ्यांचा (Farmers) कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येणार असल्याने बांगलादेश सरकारने काल 16 जानेवारीपासून कांदा आयातीवर (Onion Import) दहा टक्के आयातशुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. बांगलादेश सरकारच्या या निर्णयामुळे भारतातून बांगलादेशात होणाऱ्या कांदा निर्यातीत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचे दिसून येत आहे. 


कांदा दर (Onion Price) घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून व सर्व राज्यातील शेतकऱ्यांकडून गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारने (Central Government) कांदा निर्यातीवरील 20 टक्के शुल्क पूर्णपणे रद्द करावे, अशी मागणी होत आहे. दिल्लीतील संसदेच्या अधिवेशनात अनेक खासदारांनी तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Winter Session) अनेक आमदारांनी कांद्यावरील निर्यातशुल्क कमी करण्यासाठी मागणी केली होती. 


शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना


दोनच दिवसांपूर्वी आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजार समितीत लासलगाव येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टके निर्यातशुल्क तत्काळ शून्य करावे, या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोठे आंदोलन करण्यात आले होते. सरकार मात्र कांदा उत्पादकांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारबद्दल प्रचंड संतापाची भावना निर्माण झाल्याचे कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी म्हटले आहे. 


निर्यातशुल्क कमी करण्याची मागणी


तसेच बांगलादेशने दहा टक्के निर्यात शुल्क वाढवले आहे. त्यातच पहिले केंद्र सरकार 20 टक्के निर्यातशुल्क आकारत आहे. म्हणजेच एकूण 30 टक्के निर्यातशुल्क जाणार आहे. वातावरणामुळे उत्पादन क्षमता घटलेली आहे. मजुरीची किंमत देखील वाढली आहे. शेतकरी अत्यंत बिकट परिस्थितीत आहे हे केंद्र सरकारने लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे निर्यातशुल्क कमी करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. आता केंद्र सरकार यावर काय तोडगा काढणार? याकडे सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


रासायनिक खतांच्या दरवाढीने बळीराजा धास्तावला, नव्या वर्षात खतांच्या बॅगांसाठी किती पैसे द्यावे लागणार?


शुन्याऐवजी इंग्रजीतला 'o' मारला..एका चुकीनं सोयाबीनची रक्कम अडकली, शेकडो शेतकऱ्यांवर नामुष्की