जळगाव: एप्रिल आणि मे महिन्यात केळीची लागवड उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात  केली जात असते.  मात्र यावर्षी तापमान 45 अंश सेल्सिअस पर्यंत गेल्याने नवीन लागवड केलेल्या केळीच्या  रोपांमध्ये मरचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.  नंदुरबार (Nandurbar News)  तालुक्यातील कोरीट येथील जगदीश पाटील या शेतकऱ्याने केळीच्या उन्हापासून बचाव आणि नंतर त्याचाच खत म्हणून उपयोग या दुहेरी गोष्टी लक्षात घेऊन केळी रोपांच्या आजूबाजूला ताग (सन) लागवड केली आहे.


नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. या वाढत्या तापमानाचा फटका नवीन लागवड केलेल्या केळीला बसत असल्याचे चित्र आहे. नवीन लागवड केलेल्या केळी बागांमध्ये मरचे प्रमाण अधिक दिसून येत आहे यावर केळीचे उन्हापासून संरक्षण आणि हिरवळीचे खत म्हणून केळीच्या रोपाच्या आजूबाजूला तागाची लागवड केली. यातून शेतकऱ्याला सेंद्रिय खत आणि केळीचे उन्हापासून रक्षण असे दोन्ही बाबींचा फायदा होत आहे.


 आपल्या शेतात केळी लागवड करण्यापूर्वी दहा दिवसापूर्वी जगदीश पाटील यांनी सन(तागाची) लागवड केली आहे. त्या ठिकाणी तागाची लागवड केली आहे. त्या ठिकाणी रोपांच्या मरचे प्रमाण कमी असून यातून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कमी होत आहे. केळी आणि सण लागवडीला आतापर्यंत एक लाख रुपये खर्च झाल्याचे शेतकरी जगदीश पाटील सांगतात. 


जमिनीतील सेंद्रिय खतांचे प्रमाण कायम ठेवण्यासाठी तागाचे पीक गाडणे गरजेचे आहे.  हमखास उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कमी कालावधीत जलद वाढणारे आणि भरपूर पाला देणारे पीक आहे. द्विदल वर्गातील असल्याने वातावरणातील नत्र कमी कालावधीत घेण्याची क्षमता या पिकात असल्याने नत्र जमिनीत स्थिर होण्यास मदत होते.


1.  तागाच्या पिकापासून हेक्टरी 30 टनांपेक्षा जास्त बायोमास मिळत असल्याने त्याच्यासाठी विशेष उत्पादन तंत्र वापरण्याची गरज नाही. जमिनीतील अन्नद्रव्य, हयुमस, फल्वीक अ‍ॅसीड, सेंद्रिय कर्ब आणि नत्र वाढविण्यासाठी तागाचा फायदा होतो.


2. दीड महिन्याच्या कालावधीत विशेषतः नत्रयुक्त अन्नद्रव्य उपलब्ध होतात.  केळीचा वाढीच्या काळात हमखास हे अन्नद्रव्य उपयोगी ठरते. जास्तीत जास्त अन्नद्रव्य थोडयाच कालावधीत तागानंतरच्या पिकाला उपलब्ध होते. त्याकरिता   जमिनीमध्ये हिरवळीचे खतासाठी तागाचे पीक घ्यावे.


3.  तागाच्या फांद्या कोवळ्या आणि लुसलुशीत असल्याने, तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असल्याने कुजण्याची प्रक्रिया जलद होते. पिकांची मुळे खोलवर जात असल्याने जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्य शोषून घेतली जातात आणि पीक गाडल्यानंतर वरच्या थरात मिसळली जातात. 


 शेतीत नवनवीन प्रयोग करून  जमिनीसाठी पोषक असलेल्या आणि उन्हापासून रक्षणासाठीही महत्त्वाचे असलेल्या अशा दुहेरी फायद्याच्या ताग लागवडीचा प्रयोग जिल्ह्यात होत असल्याने शेतकऱ्यांच्या संशोधनशीलता यातून समोर येत आहे.