मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत वायव्य मुंबई मतदारसंघात मुंबईकरांना कीर्तिकर पितापुत्रांमध्ये  संघर्ष पाहायला मिळू शकतो. कारण गजानन कीर्तिकरांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांना तिकीट मिळणार असे संकेत खुद्द उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिले आहेत. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अमोल कीर्तिकरांना (Amol Kirtikar)  साथ द्या, अशी सूचना ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांना केल्याची माहिती समोर आली आहे. 


येत्या लोकसभा निवडणुकांसाठी ठाकरे गटाकडून मुंबईतल्या प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातल्या विभाग क्रमांक बाराच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. तर रविवारी चार वाजता वाजता ईशान्य मुंबई मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आलं आहे.


उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या गजानान कीर्तिकर हे खासदार आहेत आणि सध्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आहेत. खासदार कीर्तिकरांचा मुलगा अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटाचे लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार असणार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावत गजानन कीर्तिकरांनी काम केलं.  शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी मुंबईसह महाराष्ट्र पिंजून काढला होता.  पण एकनाथ शिंदेच्या बंडाच्या काळात गजानान कीर्तिकर हे ठाकरेंना सोडून गेले पण कीर्तिकरांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर मात्र ठाकरेंसोबत राहिले.


अमोल कीर्तिकर हे आदित्य ठाकरेंच्या विश्वासातले


अमोल कीर्तिकर हे आदित्य ठाकरेंच्या विश्वासातले मानले जातात. या मतदारसंघात ठाकरेंचे सहापैकी सुनिल प्रभू, रविंद्र वायकर आणि ऋतुजा लटके असे तीन आमदार आहेत तर जवळपास 10 नगरसेवक आहेत. 2014 च्या निवडणुकीत गजानन कीर्तिकर यांनी गुरुदास कामत यांचा सुमारे 1 लाख 80 हजार मतांनी पराभव केला होता. तर 2019 साली मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी या मतदारसंघातून गजानन कीर्तिकर यांना आव्हान दिलं होतं. त्यांचाही मोठ्या मताधिक्यांनी पराभव केला होता.


 गजानान कीर्तिकर सलग चारवेळा आमदार 


 गजानान कीर्तिकर हे 1990 साली ते पहिल्यांदा मालाड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. 1990, 1995, 1999, 2004 अशा सलग चारवेळेला ते आमदार झाले. 1995 ते 1998 या काळात गजानन कीर्तिकर गृहराज्यमंत्री व पर्यटन राज्यमंत्री होते. 1998 ते 99 या काळात ते नारायण राणे यांच्या कॅबिनेटमध्ये परिवहन मंत्री होते. ज्या वेळी गजानन कीर्तिकर हे शिंदेंसोबत गेले. त्याचवेळी तातडीनं पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिले आणि आपण ठाकरेंसोबत असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. आदित्य ठाकरेंच्या कोअर कमिटीमध्ये राहून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात अमोल कीर्तिकरांनी मोलाचा वाटा उचलला होता. सिनेट निवडणुकांमध्ये देखील  महत्वाची कामगिरी बजावली होती आता हाच चेहरा ठाकरेंसाठी लोकसभेचा संभाव्य चेहरा असणार आहे