Nandurbar: यंदा झालेला सरासरीपेक्षा अधिक पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढलाय. एकीकडे बोंडअळी दुसरीकडे वेचणीला मजूरही मिळत नसल्यानं आता शेतकरी हताश झाले आहेत. उभ्या कपाशीवर नंदुरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणून कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय.वेचणीसाठी मजूरही मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कापसाच्या उभ्या पिकावर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घेतला आहे.
बोंडअळीचा प्रादुर्भाव, मजूरही मिळेनात
कल्पेश भगवान पाटील यांनी शहादा तालुक्यातील करजई गावात सहा एकरावर क्षेत्रावर कापसाची लागवड केली होती. पाऊस जास्त झाल्याने कापसाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. आता यातून कसाबसे कपाशीचे पीक वाचले पण आता कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव ही मोठ्या प्रमाणात वाढल्याने कापूस पीक हातातून गेले आहे. तर दुसरीकडे मजूर टंचाईचा सामना ही शेतकऱ्यांना करावा लागत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. गुलाबी बोंडअळी ही अतिशय नुकसानकारक कीड आहे. ती बोंडाच्या आत राहून उपजीविका करते, बाहेरून या किडीच्या प्रादुर्भावाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
पंचनामे केले पण नुकसान भरपाई नाहीच!
सरकारने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केलेत मात्र अजूनही भरपाई मिळाली नसल्याच्या शेतकरी कल्पेश पाटील सांगतात. अखेर हताश होतं त्यांनी कापसाच्या उभ्या पिकावर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घेतलाय.कापूस हातातून गेला असला तरी रब्बी हंगामातील उत्पन्न घेता येईल या अपेक्षेत शेतकरी दिसून येत आहेत.सरकारने अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्ती झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले असले तरी भरपाई मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाल्याचे दिसून येत असून सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी हीच अपेक्षा असल्याचं शेतकरी सांगतायत.
अवकाळी पावसामुळे पिकावर रोगराई पडण्याची शक्यता
लातूर जिल्ह्यात देखील अनेक भागात दोन दिवसांपूर्वी पावसानं हजेरी लावली. वातावरणात गारठा वाढला आहे. लातूर शहर आणि परिसर देवणी शहर आणि परिसर निलंगा तालुक्यातील काही भाग या ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लावली आहे. मध्यरात्री अचानक आलेल्या पावसामुळे बाहेर असलेल्या लोकांची तारांबळ उडाली आहे. कव्हा हरंगुळ खोपेगाव सारोळा बाभळगाव या भागातही रिमझिम पावसाची हजेरी होती. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात प्रचंड गारठा वाढला आहे. या पावसामुळे पिकावर रोगराई पडण्याची शक्यता दाट झाली आहे. मागील काही दिवसापासून वातावरणात म्हणावा तसा गारवा जाणवत नव्हता.