Maharashtra Weather:राज्यात सध्या कोरडे आणि थंड वारे वाहू लागले आहेत. पावसाची पोषक स्थिती आता क्षीण झाली असून राज्यात कडाका वाढू लागलाय. दरम्यान, पुणेकरांना येत्या काही दिवसांत हुडहुडी भरणार आहे. राज्यातही येत्या पाच दिवसात तापमानात मोठे बदल होणार आहेत असे हवामान विभागाने नोंदवले. उत्तरेकडील राज्यांमध्ये वादळी थंड वारे वाहत आहेत. पंजाब, हरियाणामध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे. तर राजस्थानमध्ये थंडीची लाट असल्याने महाराष्ट्रात कोरडे व थंड वारे वाहत आहेत.दरम्यान, पुण्यासह आजूबाजूच्या परिसरात तापमानात घट होणार असल्याचं हवामान विभाग, पुणे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी सांगितलं.

Continues below advertisement

पुणेकरांना हुडहुडी

येत्या 5 दिवसात पुणेकरांना प्रचंड गारठ्यात रहावं लागणार आहे. भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी X माध्यमावर याविषयी पोस्ट केली आहे. पुण्यात तापमानात येत्या पाच दिवसात कसे हवामान असणार याचा अंदाज वर्तवलाय. आज पुण्यात 13 ते 14 अंश तापमानाची नोंद केली जाण्याचा अंदाज आहे. तर येत्या काही दिवसात तापमान 11 अंशांवर जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. 

 

Continues below advertisement

राज्यात बहुतांश ठिकाणी कोरडे हवामान

राज्यात येत्या पाच दिवसात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अरबी समुद्रावर असणारा कमी दाबाचा पट्टा आता पुढे सरकत बंगालचा उपसागर आणि भारतीय उपसागराच्या दिशेला आहे. येत्या 24 तासांत राज्याच्या तापमानात कमालीची घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तरेतील थंड कोरड्या वाऱ्यांनी राज्यात हवामान कोरडे राहणार आहे.

नाशिकचा  तापमानाचा पारा पुन्हा  घसरला

ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे तापमानात वाढ झाली होती. नाशिक शहरात पारा 9.4 अंशावर तर निफाड मध्ये 6.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. अवकाळी पावसामुळे गेल्या आठवड्यात थंडी गायब झाली होती. आता पुन्हा तापमानात घट झाल्याने थंडीत वाढ झाली आहे.

पुढील 10 दिवस थंडी वाढणार

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून खान्देश, नाशिक पासून थंडीत हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील 10 दिवस म्हणजे बुधवार दिनांक 18 डिसेंबर(संकष्टी चतुर्थी) पर्यंत थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र थंडीचा परिणाम दोन दिवस उशिराने  म्हणजे मंगळवार 10 डिसेंबरनंतर जाणवण्याची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. 

तापमानाचा पारा कुठवर जाणार?

पुढील 10 दिवसातील पहाटे 5 चे किमान व दुपारी 3  चे कमाल अशी दोन्हीही तापमाने घसरून, सरासरी इतकी म्हणजे, भागपरत्वे  किमान 10 ते 12 तर कमाल 28 ते 30 डिग्री से. ग्रेड दरम्यान राहण्याची शक्यता जाणवते. दरम्यान, सध्या राज्यातील सर्वच ठिकाणी वातावरण बदल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मागच्या दोन तीन दिवसापूर्वी राज्यातील काही भागात पावासनं देखील हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं होतं. यामुळं शेतकरी चांगलेच धास्तावले होते. कारण हा पाऊस फळपिकांसाठी धोकादायक असतो. त्यामुळं द्राक्ष, डाळिंब केळी उत्पादक शेतकरी चिंतेत होते. मात्र, सध्या राज्यातील पावसाचं वातावरण निवळलं आहे. पुन्हा एकदा राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान अभ्यासक माणिकारव खुळे यांनी व्यक्त केली आहे.