नांदेड : तालुक्यातील कलदगाव येथील  अल्पभूधारक शेतकरी रामचंद्र गव्हाणे यांची दोन वेळा बैल जोडी चोरीला गेली. दुसऱ्याच्या शेतात जाऊन मजुरीचे साधन म्हणजे ही बैलजोडी होती. एकाच शेतकऱ्याचे बैल दोनदा चोरीला गेल्यामुळे ते मनाने खचून गेले होते. त्याचवेळी संभाजी ब्रिगेडचे शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी त्यांची सर्व हकीकत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली आणि मदतीचा वर्षाव झाला. काही वेळातच 80 हजार रुपयांची नवीन बैलजोडी शेतकऱ्याला विकत घेऊन देण्यात आली. 


कलदगाव येथील अल्पभूधारक शेतकरी रामचंद्र गव्हाणे यांचा उदरनिर्वाह बैलजोडीच्या माध्यमातून चालतो. इतरांच्या शेतात जाऊन नांगरणी, वखरणी सह बैलांच्या माध्यमातून चालणारे सर्व शेतीची कामे ती करतात. पण त्यांची बैल जोडी सहा महिन्यापूर्वी चोरीला गेली.  त्यांनी उसनवारी करून त्यांनी बैलजोडी घेतली खरी पण दुसऱ्याही वेळी ही दोन दिवसांपूर्वी बैलजोडी पून्हा चोरीला गेली. 


फेसबुकवरून आवाहन केलं आणि 80 हजार जमा झाले


पोलिसांनीही तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. अगोदरच शेतकऱ्यांवर संकटाची मालिका असते. त्यात बैल दोनदा चोरीला गेल्यामुळे हे कुटुंब पूर्णतः खचून गेले होते. ही घटना याच गावातीलच रहिवासी असलेले संभाजी ब्रिगेडचे शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे पाटील यांना माहिती झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांनी धीर दिला. तसेच त्यांनी फेसबुक, व्हाट्सएप या सोशल मिडियाच्या माध्यमातून सदरील शेतकऱ्याची हकीकत मांडत मदतीचे आवाहन केले.  काही तासातच शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली आणि चक्क 80 हजार रुपयांची बैलजोडी शेतकऱ्यांना त्यांनी खरेदी करून दिली आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.


शेतकऱ्याला केलेल्या मदतीचे समाधान


गावातील एकाच शेतकऱ्याचे बैल वर्षात दोनदा चोरी गेल्याची पोस्ट मी माझ्या फेसबुक वॉलवर टाकल्या नंतर बऱ्याच जणांनी फोन व मेसेज करून त्या शेतकऱ्यास नवीन बैलजोडी घेऊन देऊयात म्हणून बोलले, ते मलाही पटले. शेतकऱ्याला केलेल्या या मदतीचे मनाला समाधान देणारे आहे अशी प्रतिक्रिया संतोष गव्हाणे यांनी दिली.


मदतीला धावून येणाऱ्यांचे आभार


दोनवेळा बैलजोडी चोरी गेल्यानंतर मी पूर्णतः खचलो होतो. पून्हा घेणे माझ्याने शक्यच नव्हते. माझा सर्व उदरनिर्वाह यावर अवलंबून असल्यामुळे मी प्रचंड मानसिक त्रासात होतो. अशातच आमच्या गावातील संतोष गव्हाणे मला देव म्हणून धावून आले. सर्व मदतीसाठी धावून येणाऱ्या मंडळींचे आभार मानावे तेवढे कमी आहेत अशी प्रतिक्रिया शेतकरी रामचंद्र गव्हाणे यांनी दिली.