मुंबई : मुंबईमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर भर पोलीस ठाण्यात केलेला गोळीबार ताजा असतानाच आणखी एका गोळीबाराने मुंबई हादरुन गेली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Shot in Mumbai) यांच्यावर पैशाच्या वादावरून समोरून पाच गोळ्या झाडल्याची थरारक घटना घडली. दहीसरमध्ये आज संध्याकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली.


माॅरिस नोरोन्हा असं गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच राऊंड फायर केले. यानंतर त्याने स्वत:वर डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. अभिषेक घोसाळकर यांचीही प्रकृती अत्यंत नाजूक असून त्यांच्यावर करुणा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आर्थिक वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. 


फेसबुक लाईव्ह करून गोळीबार 


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार माॅरिस आणि अभिषेक घोसाळकर यांनी एकत्र फेसबुक लाईव्ह केले. या फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर आभार मानून खूर्चीवर उठत असतानाच माॅरिस नोरोन्हाने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. हा संपूर्ण प्रकार फेसबुक लाईव्हमध्ये कैद झाला आहे. गोळीबार होताच अभिषेक यांनी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण माॅरिस नोरोन्हाने सलग पाच राऊंड फायर केल्याने ते गंभीर जखमी झाले. फेसबुक लाईव्ह अभिषेक यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता कोणतीही तणावाची परिस्थिती दिसून येत नाही. मात्र, माॅरिस नोरोन्हाने अभिषेक यांच्यावर मारण्यासाठी थंड रक्ताने कट केल्याचे स्पष्ट दिसून येते. 


कोण आहे माॅरिस नोरोन्हा?


दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार माॅरिस नोरोन्हा हा दहीसरमध्ये परिचित होता. तो स्वत:ला स्वयंघोषित नेता समजत होता, अशी माहिती समोर आली आहे. अभिषेक घोसाळकर आणि माॅरिस नोरोन्हामध्ये एक वर्षांपूर्वी टोकाचा वाद झाला होता. मात्र, त्यांची पुन्हा मैत्री झाली होती. मात्र, ही मैत्री आता जीवावर बेतली आहे. दोघांमध्ये पैशांवरून वाद होता, अशीही माहिती समोर आली आहे. माॅरिस नोरोन्हाने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्यानंतर स्वत:वरही तीन ते चार गोळ्या मारून घेत आत्महत्या केली.  माॅरिसच्या समोर आलेल्या फोटोनुसार ही तो निवडणुकीसाठी तयारी करत असल्याचे दिसून येते. 


इतर महत्वाच्या बातम्या