Nanded Success Story : पारंपरिक शेतीला जोडधंदा म्हणून अनेकजण वेगवेगळे व्यावसाय करतात. नांदेडमधील बोरगडी गावातील एका शेतकऱ्याने दुधाच्या व्यवसायाला सुरुवात केली. या शेतकऱ्याकडे पाहून गावातील अनेकांनी दूध व्यवसाय सुरू केला. आता संपूर्ण गाव दुधाच्या व्यवसायाकडे वळलं आहे. यातून या गावातील शेतकरी लाखो रुपयांची कमाई करत आहेत. 


नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी गावातील शेतकरी हनमंतू गोपूवाड यांचा प्रवास सर्व शेतकऱ्यांना आदर्शवत आहे. सालगडी ते सातेबारा वाला शेतकरी असा प्रवास नक्कीच तरुणांना प्रेरणादायी आहे. त्यांचीच प्रेरणा घेऊन मराठवाड्यातही दुधाचा व्यवसाय पुढे येऊ शकतो, हे दाखवून दिलंय. आता या गावात प्रत्येक घरी दुधाच्या व्यवसायासाठी पुढे आलय. हनुमंत गोपूवाड यांनी मागील 20 वर्षापूर्वी एक म्हैस घेऊन दूध व्यवसाय सुरू केला. आज गोपूवाड यांच्याकडे 10 म्हशी आहेत. या 10 पैकी 6 म्हशी सध्या दुभत्या आहेत. सकाळ आणि सायंकाळी असे दोन वेळा 50 लिटर दूध या म्हशी पासून मिळते. 60 रुपये लिटर प्रमाणे हे दूध गावाजवळ असलेल्या हिमायतनगर शहरात ते नेऊन विकतात. त्यातून अडीच ते तीन हजार रुपये दररोज त्यांना उत्पन्न मिळत आहे. महिन्याला जवळपास खर्च वजा करता एक लाख रुपये मिळतात. त्यांच्या याच उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. या दुधाच्या व्यवसायातून त्यांनी ५ एकर शेती देखील घेतलीय. मुलांचं उच्च शिक्षण आणि सर्व काही याच दुधाच्या व्यवसायावर चालत असून शेतकऱ्यांनी शेती सोबत जोड धंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करावा असा सल्ला हनुमंतू गोपूवाड यांनी दिलाय.


हनुमंतू गोपूवाड यांनी सुरू केलेला हा दुधाचा व्यवसाय आता गावातील प्रत्येक कुटुंबासाठी प्रेरणादायी ठरलाय. कारण आता अख्खं गाव दुधाच्या व्यवसायाकडे वळले आहेत. प्रत्येक कुटुंबाकडे दोन ते तीन म्हशी असून यातून आपल्या कुटंबाची उन्नती साधत आहेत. हनुमंतू गोपूवाड शेतात सालगडीचं काम करत करत एक म्हैस घेऊन गावात पहिल्यांदा दुधाचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर गावातील अनेकांनी त्यांची प्रेरणा घेऊन दूध व्यवसायाला सुरुवात केली. तरुण शेतकरी देखील सरकारी नोकरीच्या मागे न लागता या दुधाच्या व्यवसायाकडे वळले आहेत. निलेश शेनेवाड या तरुणाने देखील हनुमंतू गोपूवाड यांच्या दूध व्यवसायाकडे पाहून दूध व्यवसायाला सुरुवात केली.आज शेनेवाड हा तरुण देखील कुठल्याही नोकरीच्या मागे न लागता दुधाच्या व्यवसाया पासून लाखो रुपयांची कमाई करतोय. शेती सोबत जोड धंदा म्हणून गावातील एका शेतकऱ्याने दुधाच्या व्यवसायाला सुरुवात केली. या शेतकऱ्याकडे पाहून गावातील अनेकांनी दूध व्यवसाय सुरू केला. आता संपूर्ण गाव दुधाच्या व्यवसायाकडे वळलंय. यातून या गावातील शेतकरी लाखो रुपयांची कमाई करताहेत.