Onion News : कांदा खरेदीतील (Buy onions) बोगसगिरीची सखोल चौकशी होईपर्यंत नाफेड (Nafed), एनसीसीएफची कांदा खरेदी बंद ठेवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे (Bharat Dighole) यांनी केली आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांसह अधिकारी आणि व्यापारी यांची साखळी तयार होऊन नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांची (Farmers) कांदा खरेदीत कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. यामध्ये कांदा खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे खुद्द नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर यांनीच मान्य केल्याचे दिघोळे म्हणाले.


नाशिक जिल्ह्यातील काही नाफेड खरेदी केंद्रावर नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर यांनी अचानकपणे भेटी दिल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकसह महाराष्ट्रातील नाफेड व एनसीसीएफसाठी कांदा खरेदी करणाऱ्या सर्व खरेदी केंद्रावरील पुढील संपूर्ण कांदा खरेदी केंद्र सरकारने पुर्णपणे बंद ठेवावी मागणी भारत दिघोळे यांनी केलीय. 


सरकारचे 5 लाख टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट


केंद्र सरकारने यावर्षी बफरस्टॉकसाठी नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून 5 लाख टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यातील प्रत्येकी अडीच लाख टन कांदा अनुक्रमे नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून नाशिकसह महाराष्ट्रातील धुळे, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे,बीड, धाराशिव, सोलापूर आदी जिल्ह्यांतील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघांना टेंडरद्वारे कांदा खरेदीचे उद्दीष्ट ठरवून दिले आहे. संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्याचे महासंघ व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी नाफेड व एनसीसीएफसाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणे आवश्यक होते. परंतू, संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आधीच स्वस्त दरातील कांदा आपल्या गोडाऊनमध्ये भरुन ठेवलेला होता. आता नाफेडचे कांदा खरेदीचे दर वाढल्यानंतर हाच स्वस्तातील कांदा नाफेडसाठी खरेदी केल्याचे दाखवले आहे. शेतकऱ्यांकून कांदा खरेदी न करता बाजार समितीतून व्यापारी खळ्यांवरील कांदा खरेदी केला जात होता. ऑनलाईन कांदा खरेदी विक्रीमध्ये घोटाळा केल्याचे अध्यक्षांना निदर्शनास आल्याचे दिघोळे म्हणाले.


नाफेड व एनसीसीएफच्या कांदा खरेदीतील या भ्रष्टाचाराची व्याप्ती प्रचंड मोठी


नाफेडसाठी अधिकृत विकत कांद्यापेक्षा दुप्पट कांदा गोडाऊनमध्ये आढळून आला आहे. पाच ते सहा खरेदी केंद्रावर चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याचे दिसून आले आहे. आधार कार्डवर शिक्के मारून ऑनलाईन खरेदी विक्री व्यवहारात गडबड केली गेली. तसेच खरेदी-विक्री व्यवहारात दलाली होत असल्याचा अध्यक्ष जेठाभाई अहिर यांच्या पाहणीत उघड झाले आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने यापूर्वीच नाफेड व एनसीसीएफच्या कार्यालयामध्ये जाऊन लेखी पत्राद्वारे तसेच ईमेल करुन संपूर्ण कांदा खरेदी पारदर्शक पद्धतीने करावी. तसेच बफरस्टॉकसाठीच्या कांदा खरेदीत शेतकऱ्यांना सर्वाधिक दर मिळावा यासाठी नाफेड एनसीसीएफने थेट राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून लिलाव प्रक्रियेतून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा अशी मागणी केली होती. नाफेड व एनसीसीएफच्या कांदा खरेदीतील या भ्रष्टाचाराची व्याप्ती प्रचंड मोठी असून नाफेडच्या दस्तूरखुद्द अध्यक्षांनाच नाफेड कांदा खरेदीत प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले आहे. यावरुन नाफेड एनसीसीएफच्या बोगस खरेदीबद्दल महाराष्ट्र राज्य कांदा संघटनेने तसेच राज्यातील कांदा उत्पादकांनी व्यक्त केलेला संशय खरा ठरला आहे. जोपर्यंत नाफेड एनसीसीएफच्या कांदा खरेदीतील बोगसगिरीची सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत नाफेड एनसीसीएफसाठी बफर स्टॉकचा कांदा खरेदी करणाऱ्या सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे कांदा खरेदीचे काम केंद्र सरकारने तत्काळ बंद करावी अशी मागणी भारत दिघोळेंनी केलीय.