Vidarbha Monsoon : सामान्यपणे जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विदर्भ व्यापून घेणारा मान्सून यावेळी जूनच्या तिसऱ्या आठवड्यात दाखल झाला आहे. त्यामुळं पावसाची चातकासारखं वाट पाहाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि विदर्भातील नागरिकांसाटी दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज मान्सून विदर्भात दाखल झाला आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान कार्यालयानं यापूर्वी विदर्भात 19 जूनपासून पाऊस येणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, त्या अंदाजाच्या तीन दिवसाआधीच मान्सून विदर्भात दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कृषी विभागानं 70 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करु नये असे आवाहन केलं आहे.
14 आणि 15 जून रोजी विदर्भातील अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर आज हवामान विभागाने विदर्भात मान्सून दाखल झाल्याचे जाहीर केले आहे. हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ भावना यांनी दिलेल्या माहितीप्रमाणं आज मान्सून विदर्भातील सर्वच जिल्ह्यात सक्रिय झाला आहे. येणाऱ्या चार पाच दिवसात विदर्भातील सर्वच जिल्ह्यात हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असे ही त्यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत
महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सूनपूर्व पाऊस सरी कोसळत असताना नागपूरसह विदर्भात जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ही प्रचंड गर्मी आणि उकाडा होता. गेले काही दिवस तापमान 40 अंशांच्या खाली आला असला तरी उकाडा मात्र कायम होता. त्यामुळे वैदर्भीय पावसाची चातकासारखी वाट पाहात होते. शेतकऱ्यांची तर चिंताच वाढली होती. कृषी विभागानं 70 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करु नये असे आवाहन केले आहे. त्यामुळं यंदा पावसाअभावी पेरण्या खोळंबतील अशी चिन्हे होती. मात्र आता मान्सून विदर्भात दाखल झाल्याचे जाहीर होताच शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
कुठे कुठे मान्सून दाखल झाला
नागपूरच्या प्रादेशिक हवामान कार्यालयाने यापूर्वी विदर्भात 19 जूनपासून पाऊस येणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, त्या अंदाजाच्या तीन दिवसाआधीच मान्सून विदर्भात दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानुसार नैऋत्य मान्सून उत्तर अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गुजरात राज्य, संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, दक्षिण मध्य प्रदेशचा काही भाग, विदर्भाचा बहुतांश भाग, संपूर्ण तेलंगणा, दक्षिण छत्तीसगडचा काही भाग आणि दक्षिण ओडिशा, बहुतांश भागात पुढे सरकला आहे. कोस्टल आंध्र प्रदेशचा काही भाग, पश्चिममध्य आणि वायव्य बंगालच्या उपसागराचे आणखी काही भागात गुरूवार, 16 जून रोजी दाखल झाला आहे. उत्तर अरबी समुद्र, गुजरात राज्य, मध्य प्रदेश, विदर्भाचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेश आणि पश्चिममध्य व वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, छत्तीसगड आणि ओडिशाचा आणखी काही भाग, काही भागांमध्ये मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. गंगेचा पश्चिम बंगाल, झारखंड, उप हिमालयीन पश्चिम बंगालचा उर्वरित भाग आणि बिहारचा आणखी काही भाग, पूर्व उत्तर प्रदेशचा काही भागात पुढील 2 ते 3 दिवसांत सक्रिय होईल असे सांगण्यात आले आहे.
नागपूरच्या प्रादेशिक हवामान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पुढील चार पाच दिवसात हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल... मात्र, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.