Jalna Water Issues: जालना जिल्ह्यातील पाणी प्रश्नावरून भाजपकडून बुधवारी भव्य असा 'जल आक्रोश मोर्चा' काढण्यात आला होता. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यासह मोर्च्यात उपस्थित असलेल्या भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या याच टीकेला शिवसेना आमदार अंबादास दानवे (ambadas danve)  यांनी खोचक शब्दात उत्तर दिले आहे. बबनराव लोणीकर (babanrao lonikar) पाच वर्षे पाणीपुरवठा मंत्री असतानाही आज भाजपवर जालन्यात मोर्चा काढण्याची वेळ येत असल्याच प्रतिउत्तर दानवे यांनी दिले आहे. 


काय म्हणाले दानवे...


केंद्रात मंत्री असलेले भाजपचे नेते रावसाहेब दानवे गेल्या 20 वर्षांपासून जालना जिल्ह्याचे नेतृत्व करतायत. त्यांनतर सुद्धा ते मोर्चा काढत असेल तर गेली 20 वर्षे त्यांनी काय केलं. बबनराव लोणीकर पाच वर्षे पाणीपुरवठा मंत्री होते, ते जालन्याचे आहेत. मग त्यांनी सुद्धा पाच वर्षे काय केले. त्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चा का काढला नाही. एक केंद्रात मंत्री, दुसरा खुद्द पाणीपुरवठा मंत्री असून सुद्धा हे जालना जिल्ह्याला पाणी देऊ शकले नाहीत. त्यामुळे आज फडणवीस यांना मोर्चा काढण्याची वेळ आली असून, यासाठी आत्ताच्या सरकारला दोष देता येणार नसल्याच अंबादास दानवे म्हणाले.


सोलापुरातही मोर्चा काढावा... 


यावेळी पुढे बोलताना दानवे म्हणाले की, मी आज सोलापूर शहरात आहे. या सोलापुरमध्ये तब्बल 9 दिवसांनी पाणी येते. याच सोलापूर जिल्ह्यात भाजपचे खासदार आहेत,दोन आमदार असून मंत्री होऊन गेले आहेत. दुहिरी योजनेचे चार वर्षांपूर्वी भूमिपूजन झाले असून, आज सुद्धा नागरिकांना 9 दिवसांनी पाणी मिळते. त्यामुळे फडणवीस यांनी सोलापूरमध्ये सुद्धा मोर्चा काढावा असे दानवे म्हणाले. तर उद्धव ठाकरे (uddhav thackera) कार, सरकार सर्वकाही चालवत आहेत. कोरोना काळात देशातील पाच टॉप मुख्यमंत्र्यांच्या यादीत ठाकरे यांचे नाव होते आणि आहे. त्यामुळे यासाठी फडणवीस यांच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही, असा टोलाही दानवे यांनी यावेळी लगावला.