Agriculture News : आगामी रब्बी हंगामात (rabi season) रासायनिक खते (chemical fertilizers) आणि कीटकनाशकांचा वापर 20 टक्क्यांनी कमी करण्याचे आवाहन केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डॉ मनसुख मांडवीया (Dr Mansukh Mandaviya) यांनी केलं. जमिनीची सुपीकता आणि मानवी आरोग्याचे रक्षण करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे मांडवीया म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या (Farmers) उत्पन्नाला चालना देण्यासाठी गेल्या नऊ वर्षांत हाती घेतलेल्या उपक्रमांचे प्रदर्शन करण्यासाठी 'किसान समृद्धी महोत्सव' कार्यक्रमाचे आयोजन करण्याची सरकारची योजना असल्याचे मांडवीया म्हणाले.


केंद्र सरकारच्या वतीनं काढण्यात येणार कृषी रथयात्रा


केंद्रीय रसायने आणि खते मंत्री मनसुख मांडविया यांनी रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता आणि मानवी आरोग्यावरही परिणाम होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. केंद्र सरकारच्या वतीनं कृषी रथयात्राही काढण्यात येणार असल्याची माहिती मांडवीया यांनी दिली. आपल्याला रासायनिक खतांचा वापर कमी करावा लागेल. आता नॅनो-लिक्विड युरिया, नॅनो-लिक्विड डीएपी, बायो-फर्टिलायझर्स आणि पीआरओएम (फॉस्फेट रिच ऑरगॅनिक खत) सारखे पर्याय उपलब्ध आहेत. आपले पीक पोषक तत्वांनी बदलले पाहिजे असेही मांडवीया म्हणाले. 


रासायनिक खतांच्या अतिवापरामुळं जमिनीची सुपीकता कमी


देशातील 500 प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राच्या (PMKSKs) 1,000 हून अधिक शेतकर्‍यांना मंत्री मनसुख मांडविया संबोधीत केलं. यावेळी त्यांनी रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापराचा धोका स्पष्ट केला. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळं जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. तसेच मानवी आरोग्यावर देखील त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे मांडवीया म्हणाले.


देशात सध्या 150 लाख मेट्रिक टन खतांचा साठा (Fertilizer stock) उपलब्ध असल्याची माहितीही मंत्री डॉ मनसुख मांडवीया (Dr Mansukh Mandaviya) यांनी दिली.  देशात सध्या खतांची पुरेशी उपलब्धता आहे. त्यामुळं चालू खरीपासह रब्बी हंगामाची शेतकऱ्यांची खतांची गरज भागणार असल्याचे मंत्री मांडवीया म्हणाले. नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि पर्यायी खतांना चालना देण्याच्या प्रगतीचा आढावाही मांडवीया यांनी घेतला. वसुंधरेच्या रक्षणासाठी रासायनिक खतांचा अतिरेकी वापर कमी करण्याची गरज असल्याचे मंत्री मांडविया म्हणाले. शेतकऱ्यांच्या सर्व गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करणाऱ्या वन-स्टॉप-शॉप म्हणून काम करणाऱ्या देशभरातील प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांच्या उपक्रमावर देखील यावेळी चर्चा झाली.


महत्त्वाच्या बातम्या:


Fertilizer : देशात 150 लाख मेट्रिक टन खतांचा साठा, खरीपासह रब्बी हंगामाची गरज भागणार : मंत्री मनसुख मांडवीया