Agriculture News : खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र हे 142 लाख हेक्टर आहे. मात्र, पुरेसा पाऊस झाला नसल्यानं प्रत्यक्षात 20.60 लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजे 14 टक्के पेरणी झाली असल्याची माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण (Agriculture Commissioner Sunil chavan) यांनी दिली. राज्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे आणि खतांचा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे.


चालू खरीप हंगामासाठी राज्यात 19.21 लाख क्विंटल बियाणे गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार 21.78 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. राज्यासाठी 15 लाख 92 हजार 466 क्विंटल म्हणजे 82 टक्के बियाणे उपलब्ध आहे. खरीप हंगामासाठी 43.13 लाख मेट्रीक टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून आत्तापर्यंत 44.12 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यापैकी 16.53 लाख मे.टन खतांची विक्री झाली असून सद्यस्थितीत राज्यात 27.58 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. राज्यात तीन जुलैपर्यंत 140.09 मिमी. पाऊस झाला असून सरासरी पर्जन्यमानाच्या 239.06 मिमी. म्हणजे 58.08 टक्के इतका पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार बियाणांची आणि खतांची खरेदी करावी असे चव्हाण यांनी कळवले आहे. राज्यात सरासरीपेक्षा 39 टक्के कमी पाऊस पडला आहे. मात्र, जुलै महिन्यात, राज्यात उच्चांकी पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.  कोकण विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला, तरी मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाने ओढ दिली आहे.


डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन योजनेोला पाच वर्षासाठी मुदतवाढ


राज्यात नैसर्गिक, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेला सन 2027-28 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेची व्याप्ती दुसऱ्या टप्प्यात राज्यभर वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी राज्य आणि केंद्र पुरस्कृत योजनेत 1920 कोटी 99 लाख इतक्या आर्थिक तरतुदीस मान्यता देण्यात आली असल्याची माहितीही कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे. 


शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा


चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी 31 जुलै 2023 पर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे. या योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार असल्याचे चव्हाण म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : आत्तापर्यंत राज्यात 20.60 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, दुष्काळ निवारणासह खरीपा संदर्भास बैठक