Maharashtra Government : दूधाचे दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलने सुरु केल्यावर शासनाने थेट 34 रुपये एवढा दर जाहीर केला. मात्र खासगी दूध खरेदी संघांकडून कमी प्रतीच्या दुधाला एक रुपयाने दर रिव्हर्स करू लागल्याने  पूर्वीपेक्षा कमी पैसे शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शासनाने केलेली दरवाढ ही धूळफेक असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया दूध उत्पादक शेतकऱ्यांनी देण्यास सुरुवात झाली आहे.  या शासनाच्या दूध दर  वाढ समितीचे सदस्य असणाऱ्या सदाभाऊ खोत यांनीही या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया दिली. राज्यातील काही खासगी दूध संघानी शेतकऱ्यांवर दरोडा घातल्याचे सांगत पांढऱ्या दुधातील काळ्या बोक्याना आता छाप बसविल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशारा खोत यांनी दिला आहे. सध्या खासगी दूध संघानी SNF कमी बसल्यास प्रति पॉइंटला एक रुपया तर फॅट कमी बसल्यास प्रत्येक पॉइंटला ५० पैसे कमी केल्याने पूर्वी ३२ रुपये दर असताना जेवढे पैसे मिळायचे त्यापेक्षा कमी म्हणजे २७ ते २८ रुपये आता दरवाढी नंतर मिळू लागले आहेत.


या वर्षी ऐन उन्हाळ्यामध्ये दुधाचे दर कमी झाल्याने  त्या विरोधात रयत क्रांती संघटना , स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचेसह दूध उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यभर दूध आंदोलन केले होते. शेतकऱ्यांचा संताप पाहून  दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणे येथे सर्व शेतकरी संघटना व दूध संघाचे मालक यांची संयुक्त बैठक बोलवून तोडगा काढला होता. त्या बैठकीमध्ये दुधाचा दर कमीत कमी ठरवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती . त्यामध्ये या समितीच्या अहवालात दुधाला कमीत कमी ३४ रुपये दर देण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले. हा अहवाल राज्य शासनाने स्वीकारून २१ जुलैपासून दुधाला कमीत कमी ३४  रुपये दर देण्यात यावा असे शासन आदेश काढले.


दुधाचे तीस रुपये पर्यंत खाली आलेले दर वाढणार म्हणून दूध उत्पादक शेतकरी आनंदी होता, परंतु आज प्रत्यक्षात ज्यावेळी ही दरवाढ लागू झाली त्यावेळी मात्र वेगळेच चित्र समोर आले. या दरवाढीत शेतकऱ्यांच्या हातात पहिल्यापेक्षा कमी पैसे पडू लागल्यावर शेतकरी संतप्त झाला आहे.  खासगी दूध संघानी दुधाचा दर चोरण्याची एक अनोखी नवीन शक्कल लढवत राज्य शासनाने निर्धारित केलेल्या  साडेतीन फॅट आणि साडेआठ  SNF या दुधाच्या कॉलिटी ला दर ३४ रुपये दर केला. परंतु साडेआठ पेक्षा SNF कमी  म्हणजे ८. ४  लागला तर १ रुपया कमी म्हणजे ३३ रुपये लिटर दर शेतकऱ्यांना मिळेल, असे गणित घातले. जितका SNF कमी तितके रुपये कमी अशा पद्धतीने दर रिव्हर्स करू लागल्याने शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा कमी पैसे हातात पडू लागले आहेत.
 
या आधीच्या दुध दरात १ पॉईंट कमी लागला तरी फक्त २० पैसे कपात होत होती, परंतु आता ती कपात १ रुपयाने सुरु केल्याने शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आक्षेप आता शेतकरी घेऊ लागले आहेत.  वाखरी येथील संतोष साळुंखे यांच्याकडे ११ गायी असून रोज १२५ लिटर दूध डेअरीला जाते. मात्र नवीन दर जाहीर होऊनही अजून त्यांना ३४ रुपयांप्रमाणे पैसे मिळणे सोडा तर पाहिल्यापेक्षाही कमी पैसे मिळत आहेत. एका बाजूला सुग्रासचे पोते १७०० रुपये झाले, भरड्याला ५० किलोसाठी १२०० रुपये द्यावे लागतात. अशा परिस्थितीत खर्च देखील भागात नसल्याचे त्यांचे सांगणे आहे. सध्या दर कपातीबाबत खासगी दूध संघांच्या भूमिकेवर साळुंखे यांचा आक्षेप असून पूर्वी कमी प्रतीचे दूध असल्यास २० पैसे रिव्हर्स होते. चांगली प्रत असल्यास ३० पैसे वाढ होती . आता वाढ केवळ ३० पैसे ठेवली असून प्रत्येक पॉईंट मागे एक रुपया दर रिव्हर्स होत असल्याची पद्धत चुकीची असल्याचे साळुंखे सांगतात. जर १ रुपयाने रिव्हर्स करायचे असेल तर वाढ देखील तेवढीच ठेवणार का असा सवाल देखील साळुंखे यांनी केला आहे . 



अशीच अवस्था इमडेवाडीतील विजय इमडे यांची आहे . सांगोला तालुक्यातील इमडे यांच्याकडे जवळपास १५० गाई असून त्यांच्याकडे रोज ११०० लिटर दूध निघते . मात्र सध्या केलेली दर वाढही फसवी असून शेतकऱ्यांचा घात करणारी असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे . शासनाने ३-५ आणि ८-५ दुधासाठी ३४ रुपये दर केला, मात्र खासगी संघानी SNF आणि फॅट मध्ये १ रुपयाचा रिव्हर्स ठेवल्याने ३० रुपयांपर्यंत दर खाली आल्याचे इमडे सांगतात. दुधाचे दरपत्रक शासनाने ठरवून देणे गरजेचे असताना हे दरपत्रक खासगी दूध संघाने ठरविल्याने शेतकऱ्यांची घोर फसवणूक सुरु झाल्याचा आरोप इमडे यांनी केला आहे . 


यामुळे नुसते दूध उत्पादक शेतकरीच नाहीत तर दूध संकलन करणाऱ्या गावोगावच्या डेअऱ्या देखील अडचणीत आल्या आहेत. मुंढेवाडी येथील अभिमान मोरे हे स्वतः दूधउत्पादक शेतकरी असून त्यांच्या घरी रोज ७०० लिटर दूध असते . त्यांची डेअरी गावात असली तरी आता रोज शेतकरी मिळणाऱ्या पैशावरून वाद करीत असल्याने त्यांना दोन्ही बाजूने अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पूर्वी चांगल्या प्रतीच्या दुधाला ३२ रुपये भाव असूनही मोरे याना ३४ रुपये मिळायचे पण आता भाववाढीनंतर दर ३४ रुपये करूनही रिव्हर्स दरामुळे हातात केवळ २८ ते ३० रुपये पडत असल्याने मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.


शासनाने केलेल्या दूधदरवाढीचे पितळ केवळ दोनच दिवसात उघडे पडले आहे. १ रुपयाने दर रिव्हर्स करण्याचा निर्णय शासनाचा आहे की या खासगी दूधसंघानी केलेला आहे, याचा खुलासा दुग्धविकास मंत्र्यांनी करावा. शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा पुन्हा आम्हाला याच्या विरोधात आंदोलन उभे करावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सचिन पाटील यांनी दिला आहे .