IND vs WI Live Score:  भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरु आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. पहिल्या आणि तिसऱ्या सत्रात पावसामुळे काही षटकांचा काही खेळ वाया गेला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने पाच विकेटच्या मोबदल्यात २२९ धावांपर्यंत मजल मारली.  भारताकडे अद्याप २०९ धावांची आघाडी आहे. वेस्ट इंडिजने आतापर्यंत तब्बल १०८ षटके फलंदाजी केली. आज दिवसभरता वेस्ट इंडिजच्या चार फलंदाजांना बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी संयमी फलंदाजी करत भारताच्या अडचणी वाढवल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जेसन होल्डर आणि एलिक एथांजे खेळत होते. होल्डर ११ तर एलिक एथांजे ३७ धावांवर खेळत आहेत.



भारताने दिलेल्या 438 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने संयमी सुरुवात केली. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने संयमी फलंदाजी करत प्रतिकार केला. तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर ब्रेथवेट आणि मॅकेंजी यांनी वेस्ट इंडिजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण मुकेश कुमार याने मॅकेंजी याला बाद करत भारताला दिवसातील पहिले यश मिळवून दिले. मुकेश कुमार याची कसोटीमधील ही पहिली विकेट होय. एका बाजूला विकेट पडत असताना कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने दमदार अर्धशतक झळकावले. ब्रेथवेट याने ब्लॅकवूड याच्यासोबत वेस्ट इंडिजचा डाव सावरत मोठ्या भागिदारीचा पाया रचला. 


अश्विन याने अचूक टप्प्यावर मारा करत वेस्ट इंडिजच्या कर्णधाराला तंबूत पाठवले. अश्विन याने फेकलेला चेंडू ब्रेथवेट याला समजलाच नाही, त्रिफाळा उडाला. ब्रेथवेट याने २३५ चेंडूचा सामना केला. ब्रेथवेट याने पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७५ धावांची खेळी केली. 




ब्रेथवेट बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजने ठराविक अंतराने विकेट फेकल्या. ब्लॅकवूड २० धावांवर बाद झाला. रविंद्र जाडेजा याने ब्लॅकवूड याला तंबूत पाठवले. त्याने ९२ चेंडूचा सामना करताना दोन चौकाराच्या मदतीने २० धावा केल्या. रविंद्र जाडेजाच्या चेंडूवर ब्लॅकवूडचा अजिंक्य रहाणे याने जबरदस्त झेल घेतला, सोशल मीडियावर या झेलचे कौतुक होत आहे. ब्लॅकवूड बाद झाल्यानंतर लोकल हिरो जोशुआ डा सिल्वा मैदानात आला, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. जोशुआ डा सिल्वा याने २६ चेंडूत फक्त दहा धावा केल्या. मोहम्मद सिराज याने जोशुआचा अडथळा दूर केला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जेसन होल्डर आणि एलिक एथांजे खेळत होते. होल्डर ११ तर एलिक एथांजे ३७ धावांवर खेळत आहेत.


दुसऱ्या दिवशी काय झालं ?


विराट कोहलीची शतकी खेळी, रविंद्र जाडेजा आणि आर अश्विन यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने ४३८ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर अखेरच्या सत्रात वेस्ट इंडिजने दमदार सुरुवात केली होती. चंद्रपॉल आणि ब्रेथवेट याने संयमी फलंदाजी करत धावसंख्येला आकार दिला. पण रविंद्र जाडेजाच्या चेंडूवर चंद्रपॉल बाद झाला. चंद्रपॉल याने ३३ धावांची खेळी केली.