Market Committee Election Live Updates : ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची (Market Committee Election) रणधुमाळी सुरु आहे. बाजार समित्यांसाठी उद्या (28 एप्रिल) मतदान होणार आहे. या या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.  


दरम्यान, कुठे बाजार समितीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे तर कुठे निवडणुकीची चुरस पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना शिंदे गट असा समना होत आहे. त्यामुळं राज्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत. राज्यातील 257  कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक लागली आहे. यामधील काही बाजार समितीत्या बिनविरोध देखील झाल्या आहेत. बाजार समित्यांसाठी येत्या 28 एप्रिलला मतदान होणार आहे. तर 30 एप्रिलला मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळं ग्रामीण भागात कोणत्या पक्षाचं वर्चस्व आहे हे आपल्याला 30 एप्रिललाचं समजणार आहे. 


राजकीय नेत्यांचे ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप


स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी आणि शिवसेना-भाजप अशी लढती होणार आहेत. तर काही ठिकाणी काही पक्ष स्वतंत्र ताकद अजमावणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. दरम्यान, या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांना आपलेसे करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करताना दिसत आहेत. प्रचाराच्या सभा, संपर्क मोहीम यासह सर्व पद्धतीने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दोन्ही पॅनलकडून सुरु आहे. तसेच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप देखील करत आहे.


 जळगाव बाजार समितीची निवडणूक रद्द करण्याची मागणी


जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कामगाराच्या बोगस मतदार याद्या करण्यात आल्याचा आरोप कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. बोगस मतदार याद्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव बाजार समितीची निवडणूक रद्द करण्याची निवडणूक आयोगांकडं  मागणी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात बाजार समितींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून राजकारण चांगलेच तापले आहे. या निवडणुकांमध्ये बोगस मतदारांची यादी तयार करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप कामगार संघटनेच्या नेत्यांनी केला आहे. बोगस मतदारांच्या माध्यमातून निवडणूक पार पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा बाजार समितीच्या कामगार संघटनेच्या अध्यक्षांनी केला आहे.