Mumbai Crime : मुंबईतील (Mumbai) माहिम पोलीस ठाण्यातील जनरल लॉकअपमध्ये (General Lock Up) नेत असताना आरोपीने पोलीस हवालादाराचा (Police Head Constable) हात झटकून पळ काढल्याची घटना समोर आली आहे. रामकुमार रामतेज मौर्या असे या फरार आरोपीचं नाव आहे. माहिम पोलिसांची पथकं त्याचा शोध घेत आहेत.


कुर्ला पोलिसांनी (Kurla Police Station) सोमवारी (24 एप्रिल)  23 वर्षीय रामकुमार मौर्या याला चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. भादंवि कलम 379 अंतर्गत त्याला अटक करण्यात आली होती. कोर्टात हजर करुन आणि वैद्यकीय तपासणी करुन माहिम पोलीस ठाण्यातील  (Mahim Police Station) लॉकअपमध्ये नेत असताना त्याने पोलीस हवालदाराच्या ताब्यातून पलायन केसं. या प्रकरणी माहिम पोलिसांनी फरार आरोपी रामकुमार विरोधात माहिम पोलीस ठाण्यात कलम 224 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


वाहतूक कोंडीमुळे पायी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा निर्णय


रामकुमार मौर्याला न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांतर कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आलं. मग त्याला माहिम पोलिस स्टेशनच्या जनरल लॉकअपमध्ये घेऊन जात असताना त्याने पळ काढला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. त्यांनी पुढे सांगितलं की, ही घटना संध्याकाळी सातच्या सुमारास घडली. आरोपी रामकुमार रामतेज मौर्याला एस्कॉर्ट करत असलेली पोलीस व्हॅन वाहतूक कोंडीमध्ये अडकली होती. त्यानंतर हवालदार हंसराज गायकवाड यांनी आरोपीला घेऊन पायी पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला.


हवालदाराच्या हाताला झटकत आरोपीचा पळ


"सर्वसाधारणपणे अटक केल्यानंतर पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपीला रात्री जनरल लॉकअपमध्ये ठेवले जाते. त्यानुसार पोलीस त्याला माहिम पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये घेऊन जात होते. पोलीस हवालदार हंसराज गायकवाड आणि आरोपी रामकुमार मौर्या दोघेही पोलीस ठाण्याच्या दिशेने जात असताना आरोपीने हवालदाराचा हात झटकत तिथून पळ काढला. हवालदार गायकवाड यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला.


पलायन केलेल्या आरोपीचा शोध सुरु


रामकुमार मोर्या याच्याविरोधाच कलम 224 (एखाद्या व्यक्तीने त्याच्या कायदेशीर अटकेला प्रतिकार किंवा अडथळा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. "आमची पथकं आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत," असं माहिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर बाबुराव शिरसाट यांनी सांगितलं.


हेही वाचा