Marathwada News : मराठवाड्यात शेतकरी (Farmers) आत्महत्यांचे प्रमाण थांबण्याचे नाव घेत नाही. यंदाच्या उन्हाळ्यात म्हणजेच 1 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान, विभागात एकूण 269 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. याचा अर्थ दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. मार्च महिन्यात सर्वाधिक 106 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.
या आत्महत्यांमागे मुख्यत्वे करून कर्जबाजारीपणा, शेतीचा वाढता खर्च, शेतमालाला मिळणारा अल्पभाव, नापिकी, खाजगी सावकारांकडून घेतलेले कर्ज, तसेच अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे झालेले नुकसान ही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे बोलले जात आहे.
तीन महिन्यात 269 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
शासनाने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्या असल्या तरी त्याचा फारसा सकारात्मक परिणाम दिसून येत नाही. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात 87, फेब्रुवारीत 76 आणि मार्चमध्ये 106 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजेच तीन महिन्यात एकूण 269 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.
177 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित
शासनाकडून अशा घटनांमध्ये मृत शेतकऱ्यांच्या वारसांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत 79 प्रकरणांत ही मदत मंजूर करण्यात आली आहे, तर 13 प्रकरणे विविध कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आली आहेत. उर्वरित 177 प्रकरणे अद्याप चौकशीसाठी प्रलंबित आहेत.
जिल्हानिहाय शेतकरी आत्महत्यांचे आकडे पुढीलप्रमाणे
बीड – 71
छत्रपती संभाजीनगर – 50
हिंगोली – 37
परभणी – 33
धाराशिव – 31
लातूर – 18
जालना – 13
एकूण शेतकरी आत्महत्या – 269
अजित पवारांचं पीक विमा योजनेवर मोठं वक्तव्य
दरम्यान, एक रुपयामध्ये पीक विमा योजना आम्ही सुरू केली होती, पण ती योजना आमच्या अडचणीत आली. त्यामध्ये खूप लोकांनी आम्हाला चुना लावला, चुनाच लावला, असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ‘दिशा कृषी उन्नतीची 2029’ या विशेष कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी पीक विमा योजनेबाबत वक्तव्य केलंय. "त्यानंतर आम्ही आता सगळं काढून टाकलं आहे. आता तुमच्या भल्याचं जे असेल तेच आम्ही करणार आहोत.", असेही अजित पवारांनी म्हटले आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या