Strawberry Success Story : सध्या शेतकरी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन भरघोस उत्पादन घेत आहेत. असाच एक स्ट्रॉबेरी (Strawberry) शेतीचा यशस्वी प्रयोग गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील शेतकऱ्यानं केला आहे. संजय जसाणी (Sanjay Jasani) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. योग्य व्यवस्थापन, मार्गदर्शन आणि मेहनतीच्या बळावर प्रतिकुल भौगोलिक वातावरणातही गोंदिया जिल्ह्यातील एका शेतकर्‍यानं लालबुंद स्ट्रॉबेरीतून चांगल उत्पादन घेतलं आहे.


 सिमेंट पाईपच्या व्यवसायाबरोबरच यशस्वी शेती 


योग्य व्यवस्थापन, मार्गदर्शन आणि मेहनतीच्या बळावर प्रतिकुल भौगोलिक वातावरणातही गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी संजय जसाणी यांनी लालबुंद स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्याची किमया केली आहे. संजय जसाणी यांचा गोंदिया शहरात सिमेंट पाईप बनवण्याचा व्यवसाय आहे. मात्र, त्यांचे या व्यवसायासोबतच निसर्गावर प्रचंड प्रेम आहे. त्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडते. त्यामुळं त्यांनी आपल्या सिमेंट पाईपच्या व्यवसायाबरोबरच शेती करायला सुरुवात केली. त्यांनी शेतात भाजीपाला पिकांसह फळबाग देखील फुलवली आहे. 


स्ट्रॉबेरीचे 1.5 टन उत्पादन होण्याची अपेक्षा


गोंदिया शहरापासून जवळच असलेल्या चारगाव इथं शेतकरी संजय जसाणी यांनी प्रयोगशील शेती केली आहे. त्यांच्या 22 एकर शेतीत भाजीपाल्यासह विविध पीक घेतात. स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुट यासारखे नवनवीन फळ लागवडीचे प्रयोगही कृषी विभागाच्या मार्गदर्शनात जसाणी करतात. त्यांनी नव्यानेच 20 आर जागेत 4 हजार 500 स्ट्रॉबेरी (Strawberry) रोपांची लागवड केली आहे. त्यापासून त्यांना स्ट्रॉबेरीचे उत्पन्न सुरु झाले आहे. 200 ग्रॅमच्या डब्याची पॅकींग करुन गोंदियाच्या बाजारात विक्री करत आहेत. स्ट्रॉबेरीचे 1.5 टन उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. पुढील वर्षी स्ट्रॉबेरी क्षेत्रात वाढ करण्याची इच्छाही जसाणी यांनी व्यक्त केली.


200 ग्रॅमच्या डब्यामध्ये स्ट्रॉबेरीचे पॅकिंग 


शेतकऱ्यांनी योग्य नियोजन केल्यास स्ट्रॉबेरीचे चांगले उत्पन्न मिळत असल्याची माहिती शेतकरी संजय जसाणी यांनी दिली. मार्केटमध्ये स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे. दरही चांगला मिळत असल्याचे जसाणी म्हणाले. 20 आर जागेत साडेचार रोपांची लागवड केल्याची माहिती जसाणी यानी दिली आहे. स्ट्रॉबेरीची तोडणी केल्यानंतर आम्ही 200 ग्रॅमच्या डब्यामध्ये याची पॅकिंग करतो. या बॉक्सची आम्ही 45 रुपयांनी विक्री करत असल्याची माहिती जसाणी यांनी दिली. 


जसजसे तापमान वाढत जाते तस तसे उत्पादन कमी होत


आपण जर ऑक्टोबर महिन्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली तर जानेवारीपर्यंत आपल्याला याचे उत्पादन घेता येते. जसजसे तापमान वाढत जाते तस तसे उत्पादन कमी होत असल्याची माहिती जसाणी यांनी दिली. कारण हे थंड प्रदेशातील पीक आहे. त्याचे योग्य नियोजन केल्यास आपण चांगले उत्पादन घेऊ शकतो असे जसाणी म्हणाले.  


महत्त्वाच्या बातम्या:


तळकोकणाच्या लाल मातीत बहरली स्ट्रॉबेरीची शेती, सिंधुदुर्गच्या शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग