मुंबई : राज्यात कुठे ऊन, तर कुठे पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. कोकणात काही भागात उष्णतेची लाट तर काही भागात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.  राज्यात काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर दिसून येत आहे. जोरदार वारे आणि विजेच्या गडगडाटासह लातूरमध्ये पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. बुलढाणा जिल्ह्यातही अनेक भागात अवकाळी पावसाच्या सरी दिसत आहेत. खामगाव, शेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. 


रत्नागिरी, चिपळूणमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात 


विजांच्या कडकडाटासह चिपळूण आणि परिसरात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. रत्नागिरी, चिपळूणमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाच्या आगमनाने उष्णतेने त्रस्त नागरिक सुखावला आहे, पण आंबा बागायतदार मात्र चिंतेत आहेत. रायगडच्या माणगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस सूरु झाला आहे. रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड परिसरात पाऊस सुरू आहे.


रायगडमध्ये जोरदार अवकाळी पाऊस 


रायगड जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार अवकाळी पाऊस पाहायला मिळत आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची आणि नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अवकाळी पावसामुळे मात्र आंबा बागायतदार आणि जांभूळ पीक घेणारे शेतकरी चिंतेत आहेत. रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाला आहे. रायगडच्या महाड, माणगाव, पोलादपूर , म्हसळा श्रीवर्धन भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. लोनेर परिसरात गारांचा पाऊस कोसळला आहे.  


अचानक वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी


रायगडच्या दक्षिण भाग असलेल्या माणगाव महाड पोलादपूर म्हसळा श्रीवर्धन हरिहरेश्वर परिसरात आज अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत कडक उन्हाचे चटके बसत असताना अचानक रायगडच्या या भागात वादळी वाऱ्यासह ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि अचानक अवकाळी पाऊस कोसळू लागला. रायगड जवळील पाचाड येथे असलेल्या भागात सद्यःस्थितीत जोरदर पाऊस कोसळत असून लोनरे म्हसळा परिसरातील भागात आणखी जोरदार पाऊस लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.


लातूरमध्ये पावसाची तुफान बॅटिंग


लातूर शहर आणि परिसरात आज दुपारी तीन वाजता पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तुफान वारे आणि विजेच्या गडगडला सुरुवात झाली होती. काहीवेळाने पावसाने हजेरी लावत वातावरणाचा नूर पालटला. अर्धातास पेक्षा अधिक काळ पावसाने तुफान बॅटिंग केली. रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. आज सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. या पावसामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण आहे त्यात लामजना किल्लारी औसा आणि निलंगा तालुक्यातील अनेक भागात पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी पडून गेल्या आहेत. त्याच वेळी लातूर शहर आणि परिसरात मात्र पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. 


अवकाळी पावसामुळे भातपिकाची नासाडी


मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील भात पिकांचं मोठं नुकसान झालं. कापणीला आलेला भातपीक वादळी वारा आणि पावसामुळे जमीनदोस्त झालं तर काही भागात मळणीसाठी कापून ठेवलेला भातपीकाच्या कडपा पाण्याखाली आल्यानं भातपिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली तर काही ठिकाणी पावसात भिजल्यानं भातपिकांना दुर्गंधी सुटली आहे. अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. पावसानं आता उसंत घेतली असून शेतकऱ्यांनी आता धान मळणी केली आहे. मात्र, तिला मार्केटमध्ये दर मिळेल की नाही, ही भीती व्यक्त होत आहे. किमान हातात आलेल्या भात पिकाला योग्य दर मिळावा, यासाठी पावसात भिजलेल्या धानाला सुकविण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.