Sugar News:  राज्यात आणि देशात अनेक भागात जोरदार पाऊस होत आहे अनेक ठिकाणी तर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, साखर उत्पादन (Sugar Production) करणार्‍या क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत नसल्याने त्याचा परिणाम  साखर उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. त्याच्या परिणामी शेतकरी आणि साखर कारखान्याचे आर्थिक गणित तर बिघडणार आहेच सोबतच साखरेच्या दरावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.


सध्या राज्यात आणि देशात सर्वदूर पाऊस पडत आहे. मात्र, साखर कारखानदारी पट्ट्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. ऊस हे पिक प्रामुख्याने मुबलक पाण्यावर अवलंबून असल्याने आणि पावसाळ्यात मशागतीसोबतच खतांच्या मात्रेसोबत पाण्याची गरज असतांना लांबलेला पावसाचा फटका नवीन ऊस लागवडीसोबतच ऊस आणि पर्यायाने साखर उत्पादनाला बसणार आहे. यामुळे यंदा राज्यात साखरचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा वगळता ऊस साखर कारखानदारी असणार्‍या अहमदनगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यातील काही भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. नेमका हाच पट्टा साखर कारखानदारीशी निगडीत आहे. एकट्या अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर गेल्यावर्षी 35 हजार हेक्टरवर आडसाली ऊसाची लागवड झाली होती. यंदा मात्र केवळ 11911 हेक्टरवरच ऊसाची लागवड झाली असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले आहे.


एकट्या अहमदनगर जिल्ह्यात सध्या 12.58 टक्के ऊसाची लागवड झाली आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय ऊस लागवड पुढीलप्रमाणे:


> नगर:  101 हेक्टर, 


> पारनेर:  64 हेक्टर, 


> श्रीगोंदा: 5 हजार 332 हेक्टर, 


> कर्जत: 1 हजार 285 हेक्टर, 


> जामखेड:  296 हेक्टर, 


> पाथर्डी:  551 हेक्टर, 


> संगमनेर:  164 हेक्टर, 


> कोपरगाव:  259 हेक्टर 


एकट्या अहमदनगर जिल्ह्यात ही स्थिती आहे. नाशिक, पुणे, सोलापूर जिल्ह्यातही ऊस क्षेत्रात समाधानकारक पाऊस नसल्याने तिथेही लागवड क्षेत्र घटले आहे. याचा परिणाम साखर कारखान्यावर शेतकऱ्यांवर आणि साखरेच्या किंमतीवर देखील होणार आहे.


जून-जुलै महिना लोटला तरी देखील दमदार पाऊस न झाल्याने ऊस लागवड घटली आहे. त्यामुळं साखर उत्पादन देखील घटणार आहे.  त्यामुळे साखरेच्या किंमतीचा समतोल राखण्यासाठी सरकारकडून साखर निर्यातीवर जर बंदी घालण्यात आली तर साखर कारखानदारांना शेतकऱ्यांना  उसाला चांगला दर देता येणार नाही.


इतर महत्त्वाच्या बातम्या: