Mumbai Traffic News:  मुंबईतील दहिसर ते ठाणे जिल्ह्यातील भाईंदर हे अंतर आता अवघ्या 10 मिनिटात गाठता येणार आहे. दहिसर - भाईंदर उन्नत जोडरस्ता (डीबीएलआर) प्रकल्पातील निविदा प्रक्रिया यशस्वी होवून एक महत्वाचा टप्पा आज गाठला गेला आहे. या प्रकल्पासाठी एल ऍण्ड टी कंपनीने सर्वात कमी किंमतीची बोली लावली आहे. मुंबई किनारी रस्त्याचा अंतिम टप्पा असलेला हा उन्नत मार्ग मु्ंबई महानगरपालिकेने 4 वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मुंबईकरांसाठी रस्ते वाहतुकीसाठी विनाअडथळा आणि सिग्नल विरहीत असा दहा मिनिटात अंतर गाठण्याचा उत्तम पर्याय या प्रकल्पाच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. रस्ते वाहतुकीची पर्यायी कनेक्टिव्हिटी उपलब्ध करणाऱ्या या प्रकल्पात एक पूल आणि दोन आंतरबदल (Interchange) मार्गिकांचा समावेश आहे.


मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवास वेगवान व्हावा तसेच मुंबई आणि भाईंदर ही दोन शहरे जोडण्यासाठी उन्नत मार्गाची आखणी करण्याचे निर्देश मु्ंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)  पी वेलरासू यांनी दिले होते. त्यानुसार आराखडा तयार करून दहिसर-भाईंदर उन्नत मार्गासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. या प्रकल्पाच्या निमित्ताने जलद वाहतुकीचा पर्याय दोन्ही शहरातील नागरिकांना मिळणार तर आहेच, समवेत सिग्नलचा अडथळा नसलेला मार्ग तसेच वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून या नवीन मार्गाचा वापर नागरिकांना करता येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिली आहे. प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर पुढील तीन वर्षांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही कंपनीची असेल. 


सध्या पश्चिम उपनगरात दहिसर (पश्चिम) ते भाईंदर (पश्चिम) या भागात फक्त रेल्वे मार्गाद्वारे जोडणी उपलब्ध आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या निमित्ताने दहिसर ते भाईंदर दरम्यान आता रस्ते जोडणी (कनेक्टिव्हिटी) उपलब्ध होणार आहे. मु्ंबई महानगरपालिका या पूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. त्यासाठी एकूण 45 मीटर रूंद आणि पाच किलोमीटर लांब अंतराच्या उन्नत मार्गाची निविदा प्रक्रिया मु्ंबई महानगरपालिकेने ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू केली होती.


या निविदा प्रक्रियेतील आर्थिक निविदेचा टप्पा यशस्वीपणे आज  पार पडला. महानगरपालिकेने या प्रकल्पासाठी एक हजार 998 कोटी रूपयांच्या अंदाजित खर्चासाठी निविदा प्रक्रिया राबवली. त्यामध्ये लार्सन एण्ड टुब्रो (एल ऍण्ड टी) कंपनीने सर्वात कमी किंमतीची (1981 कोटी रूपये) बोली लावली. त्यामुळे आता विहित प्रक्रियेनुसार या प्रकल्पाचे काम लार्सन एण्ड टुब्रो कंपनीला देण्यात येणार आहे. 


दहिसर-भाईंदर जोडरस्त्यासाठीचे बांधकाम हे कमाल 42 महिन्यात करणे अपेक्षित आहे. तसेच, प्रकल्प परवानग्यांसाठी सहा महिने अतिरिक्त अंदाजित कालावधीचा देखील समावेश आहे. सदर प्रकल्प अंतर्गत मु्ंबई महानगरपालिका हद्दीत 1.5 किमीचा उन्नत मार्ग आणि मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत 3.5 किमी उन्नत मार्गाचा समावेश असेल. या संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी मु्ंबई महानगरपालिकेकडून करण्यात येईल. तर मिरा भाईंदर हद्दीतील प्रकल्पासाठीच्या खर्चाचा परतावा हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मु्ंबई महानगरपालिकेला देण्यात येणार आहे.


दहिसर खाडी भागात या प्रकल्पाच्या निमित्ताने स्टीलचा सुमारे 100 मीटर अंतराचा पूल तयार करण्यात येईल. एकूण 5 किमी उन्नत मार्गांसाठी एकूण 330 खाबांचा आधार असणार आहे. प्रत्येक 30 मीटर अंतरावर हे खांब असतील. संपूर्ण रस्ता सिमेंट कॉंक्रिटचा तयार करण्यात येणार आहे. दहिसर भाईंदर जोड रस्त्याचा वापर  प्रति दिन एकूण 75 हजार वाहने करतील, असा अंदाज आहे. या प्रकल्प अंतर्गत दोन आंतरबदल मार्गिका असतील. त्यामध्ये दहिसर आणि भाईंदर अशा दोन्ही बाजूसाठी आंतरबदल मार्गिका असेल. तर पाच किलोमीटरच्या अंतरासाठी आठ मार्गिकांचा (lane) समावेश राहणार आहे, अशी माहिती उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी दिली. 



>> प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये-


> दहिसर पश्चिम आणि भाईंदर पश्चिमेला कनेक्टिव्हिटी 


> उन्नत मार्गाची एकूण लांबी- पाच किमी 


> उन्नत मार्गाची रूंदी- 45 मीटर


> एकूण मार्गिका- 8 (आठ)


> वाहनांचा अंदाजित वापर-  75 हजार प्रति दिन  


> प्रकल्पासाठी अंदाजित कालावधी- 48 महिने


प्रकल्पासाठी अंदाजित खर्च-  1 हजार 959 कोटी रूपये 


देखभाल आणि दुरूस्ती खर्च-  (3 वर्षे) 23 कोटी रुपये


आंतरबदल मार्गिकांची संख्या- दोन